एसटीच्या गर्दीत विद्यार्थ्यांचे भविष्य अडकले; तळेगाव दिघे–जवळके मार्गावर जादा बसची मागणी

एसटीच्या गर्दीत विद्यार्थ्यांचे भविष्य अडकले; तळेगाव दिघे–जवळके मार्गावर जादा बसची मागणी


एसटीच्या गर्दीत विद्यार्थ्यांचे भविष्य अडकले; तळेगाव दिघे–जवळके मार्गावर जादा बसची मागणी
कोपरगांव । प्रतिनिधी ।तळेगाव दिघे मार्गे जवळके–कोपरगाव या मार्गावरून राजनगाव देशमुख, अंजनापूर, वेस, जवळके, धोंडेवाडी, बहादरपूर, बहादराबाद, शहापूर आदी गावांमधील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज कोपरगाव येथे शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. मात्र, सकाळच्या वेळेत या मार्गावर बसची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे.

सकाळच्या वेळेत उपलब्ध असलेल्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. परिणामी काही विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताच येत नसल्याने त्यांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शाळा, महाविद्यालय तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वेळेवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शिक्षणाची महत्त्वाची आधारव्यवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालयात पोहोचता यावे आणि त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, यासाठी सकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर किमान एक-दोन जादा बसफेऱ्या सुरू करणे गरजेचे आहे. कोपरगाव आगार प्रमुखांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन तळेगाव दिघे–जवळके–कोपरगाव मार्गावर सकाळच्या वेळेत जादा बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांचे शिक्षण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



