बैलपोळ्याच्या मिरवणुकीत ‘भावी नगराध्यक्ष युवराज पठारे’च्या घोषणांनी वेधले लक्ष

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत ‘भावी नगराध्यक्ष युवराज पठारे’च्या घोषणांनी वेधले लक्ष

पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांच्या बैलपोळा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
पारनेर । प्रतिनिधी । ढोल-ताशांचा गजर, आकर्षक सजविलेल्या बैलजोड्या, पारंपरिक वेशभूषा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग अशा वातावरणात पारनेर शहरात नगरसेवक पै. युवराज पठारे यांच्या वतीने भव्य बैलपोळा महोत्सव उत्साहात पार पडला. मात्र, या महोत्सवातील मिरवणुकीदरम्यान समर्थकांकडून देण्यात आलेल्या ‘भावी नगराध्यक्ष… युवराज पठारे!’ या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आगामी पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणांमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

पारनेर शहरात रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत या बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून त्यांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात शहरातून भव्य बैलजोडी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नागरिकांसह विशेषतः युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध बैलगाडा शर्यती व प्रदर्शनांमध्ये तब्बल ३६ वेळा प्रथम क्रमांक पटकावलेली विशेष बैलजोडी ठरली. २२ महिन्यांची आणि दोन दाती असलेल्या या बैलजोडीची किंमत ६ लाख ५१ हजार रुपये असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. ही बैलजोडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मिरवणुकीदरम्यान युवक आणि समर्थकांकडून नगरसेवक युवराज पठारे यांच्या समर्थनार्थ ‘भावी नगराध्यक्ष’च्या घोषणा देण्यात आल्या. आगामी नगरपंचायत निवडणुकीची राजकीय समीकरणे आकार घेत असतानाच या घोषणांनी पठारे यांच्या नावाभोवती राजकीय चर्चा सुरू झाली आहे.यावेळी नगरसेवक युवराज पठारे यांनी आगामी राजकीय नेतृत्वाबाबत भूमिका मांडताना, “माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विचारांचा नगराध्यक्ष येणाऱ्या काळात पारनेर शहराला मिळेल. आम्हीच येथे कायम आहोत, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असे सांगितले.

बैलपोळा महोत्सवामागे कोणताही राजकीय हेतू नसून पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य उद्देश असल्याचेही पठारे यांनी स्पष्ट केले.महोत्सवानिमित्त आयोजित रिल्स स्पर्धेलाही युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धकांनी महोत्सवाची दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपत रिल्स तयार केल्या. सहभागी स्पर्धकांना नगरसेवक युवराज पठारे मित्र परिवाराच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.या कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते, ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व कुंडलिक पठारे, युवा नेते मंगेश दाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, शिवसेना तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.तसेच दत्तानाना पवार, मनोज मुंगसे, अर्जुन भालेकर, योगेश मते, विकास रोकडे, सुभाष सासवडे, सतीश पिंपरकर, दत्ता दिवटे, निवृत्ती वरखडे, किरण कोकाटे, ऋषिकेश गंधाडे, यशवंत पठारे, प्रवीण पठारे, प्रदीप नगरे, प्रसाद कर्णावट आदी उपस्थित होते.बैलपोळ्याच्या पारंपरिक उत्सवातून शेतकरी संस्कृतीचा जागर झाला असला, तरी मिरवणुकीत घुमलेल्या ‘भावी नगराध्यक्ष युवराज पठारे’ या घोषणांनी पारनेरच्या आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांनाही चालना दिली आहे.



