पशुपालकांच्या मदतीसाठी विभागांनी समन्वयाने काम करा – राजेश आबा परजणे

पशुपालकांच्या मदतीसाठी विभागांनी समन्वयाने काम करा – राजेश आबा परजणे


पशुपालकांच्या मदतीसाठी विभागांनी समन्वयाने काम करा – राजेश आबा परजणे
कोपरगांव । प्रतिनिधी । दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांच्या अडचणी, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय तसेच पशुधनासंदर्भातील सर्वेक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती, कोपरगाव येथे मंगळवारी (दि. ६) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार झालेल्या या बैठकीत दुष्काळाच्या परिस्थितीत पशुपालकांना आवश्यक सहकार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच बायफचे सर्व कृत्रिम रेतन तज्ज्ञ उपस्थित होते. दुष्काळामुळे शेतीबरोबरच पशुपालन व्यवसायावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने पशुधनाची योग्य काळजी, उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर आणि पशुपालकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेणे, त्यांच्याकडून आवश्यक माहिती संकलित करणे आणि त्यानुसार पुढील नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, दुष्काळाच्या काळात पशुपालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाचे काम अचूक व वेळेत पूर्ण झाल्यास भविष्यातील उपाययोजना करण्यास मोठी मदत होईल, असे परजणे यांनी स्पष्ट केले.“सर्व संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून, मिळून-मिसळून काम करावे. पशुपालकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य वेळेत मिळणे गरजेचे आहे,” असे आवाहन राजेश आबा परजणे यांनी केले.बैठकीदरम्यान पशुपालकांच्या समस्या, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसायासमोरील संभाव्य अडचणी तसेच सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना कोणत्या प्रकारे मदत व मार्गदर्शन करता येईल, याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या या उपक्रमामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, आगामी काळात सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



