जागतिक केटलबेल स्पर्धेत श्री साईबाबा संकुलाचा डंका; ५ सुवर्णांसह १२ पदकांची कमाई


जागतिक केटलबेल स्पर्धेत श्री साईबाबा संकुलाचा डंका; ५ सुवर्णांसह १२ पदकांची कमाई


जागतिक केटलबेल स्पर्धेत श्री साईबाबा संकुलाचा डंका; ५ सुवर्णांसह १२ पदकांची कमाई
शिर्डी । प्रतिनिधी । दिल्ली येथे ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘IUKL वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप २०२६’ या जागतिक स्तरावरील स्पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवली. संकुलाच्या ९ खेळाडूंनी तब्बल ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १२ पदके पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह रशिया, अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, इंग्लंड, मंगोलिया, फ्रान्स, पोलंड, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर अशा १२ देशांतील ३०२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर साईबाबा संकुलाच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी संस्थेसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.स्पर्धेत ओंकार कोल्हे याने तब्बल २ सुवर्ण व १ रौप्यपदक, तर अनिकेत पायमोडे याने १ सुवर्ण व १ रौप्यपदक पटकावले. साई चौधरी आणि श्रुती उपाध्ये यांनी प्रत्येकी सुवर्णपदक मिळविले.

तसेच हुजेब मनियार आणि आराध्या ढेंबरे यांनी प्रत्येकी रौप्यपदक, तर तुषार साकट, पवन बोधके आणि सुनील जाधव यांनी प्रत्येकी कांस्यपदक मिळवत आपल्या यशात भर घातली.
खेळाडूंची पदकांची कमाई
– ओंकार कोल्हे – २ सुवर्ण, १ रौप्य
– अनिकेत पायमोडे – १ सुवर्ण, १ रौप्य
– साई चौधरी – १ सुवर्ण
– श्रुती उपाध्ये – १ सुवर्ण
– हुजेब मनियार – १ रौप्य
– आराध्या ढेंबरे – १ रौप्य
– तुषार साकट – १ कांस्य
– पवन बोधके – १ कांस्य
– सुनील जाधव – १ कांस्य
या यशाबरोबरच संस्थेचे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते यांनी इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग (IUKL) सर्टिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले.साईबाबा संकुलाच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते आणि सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



