ब्रेकिंग

पशुधनाच्या सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’

पशुधनाच्या सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’

जाहिरात -7756405359

मंत्री विखे पाटील यांच्या सूचनेनंतर पशुसंवर्धन विभागाकडून आराखडा तयार

लोणी । प्रतिनिधी । टंचाईच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांकडे जाऊन पशुधनाची माहिती संकलित केली आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार टंचाईच्या काळात चारा उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी ‘अहिल्यानगर पॅटर्न’ तयार करण्यात येत आहे. चारा उत्पादनाचे हे नियोजन टंचाईच्या काळात पशुधनासाठी मोठा आधार ठरणार आहे.जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन टंचाई आढावा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये प्रामुख्याने चारा टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध असलेली पशुधनाची आकडेवारी, चारा उत्पादनाचे नियोजन आणि बियाणे वाटपातील त्रुटी यांचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागाने तालुकानिहाय स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी प्रत्येक बैठकीत दिल्या होत्या.प्रत्येक तालुक्यातील पशुपालकांची संख्या, पशुधनाची संख्या, चारा उत्पादन करणारे शेतकरी, चाऱ्याची मागणी करणारे शेतकरी तसेच शासनाच्या योजनेंतर्गत मोफत बियाणे घेऊन चारा उत्पादन करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. यासाठी मंत्री डॉ. विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सर्वेक्षणाचा स्वतंत्र प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.पावसाअभावी यावर्षी चारा पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे टंचाईच्या परिस्थितीत पशुधनाचे संगोपन करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. अशा परिस्थितीत चारा उत्पादन आणि उपलब्धतेच्या नियोजनावर प्रशासकीय यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण जिल्ह्यात यासंदर्भातील सर्वेक्षण सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर असून, जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने करण्यात येणारे नियोजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टंचाईच्या परिस्थितीत पशुपालकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.पशुसंवर्धन विभागाकडून यापूर्वीच पशुधनाची गणना करून जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे जनावरांच्या नोंदी उपलब्ध आहेत. नव्या सर्वेक्षणातून या नोंदींची पुन्हा पडताळणी होत असल्याने पशुधनाची नेमकी संख्या, चाऱ्याची मागणी आणि भविष्यातील चारा उपलब्धतेचे नियोजन अधिक अचूकपणे करता येणार आहे.

चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आग्रही भूमिका पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. टंचाई आढावा बैठकांमध्ये त्यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराचा आवर्जून उल्लेख केला. पशुसंवर्धन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली असून, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारीही दर्शवली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!