ब्रेकिंग

मोबाईलच्या विळख्यातून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या विश्वात नेणारा संवत्सरचा वाचनकट्टा!

मोबाईलच्या विळख्यातून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या विश्वात नेणारा संवत्सरचा वाचनकट्टा!

लोकसहभागातून उभी राहू शकते ग्रामीण शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ; उपसचिव वैशाली डिगे यांचे प्रतिपादन

कोपरगाव । प्रतिनिधी ।  ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणारा वाचनकट्टा हा उपक्रम केवळ शालेय उपक्रम न राहता त्याला लोकसहभागाची जोड मिळाली, तर तो ग्रामीण शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ बनू शकतो. पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आलेल्या ‘कुसुमाग्रज वाचनकट्टा’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे शिक्षण विभागाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसरपंच विवेक परजणे, राहाता पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, कोपरगाव पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र दिघे, शाखा अभियंता आश्विन वाघ, विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे, प्रशांत तोरवणे, ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे, मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी स्वागत केले, तर शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख यांनी प्रास्ताविक केले.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी क्षितिजे प्राप्त करून देणारा, कल्पनाशक्तीला भरारी देणारा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला समृद्ध करणारा वाचनकट्टा हा उपक्रम संवत्सर जिल्हा परिषद शाळेने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक जडणघडणीला यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास वैशाली डिगे यांनी व्यक्त केला.त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या संक्रमणशील आणि डिजिटल युगात मोबाईल, दूरचित्रवाणी तसेच विविध मनोरंजनाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आवड कमी होत असल्याचे दिसून येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, भाषिक क्षमता विकसित करणे, शब्दसंपत्तीत भर घालणे आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सर्वच शाळांमध्ये वाचनकट्ट्यासारखी संकल्पना राबविल्यास उद्याची सुजाण, सुसंस्कृत आणि विचारशील पिढी घडविण्यास निश्चितच मदत होईल.पुणे शिक्षण विभागाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी संवत्सर शाळेत आजवर राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने राबविलेले उपक्रम इतर शाळांसाठी अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीवर शाळेला प्राप्त झालेल्या शैक्षणिक पुरस्कारांतून शाळेची प्रगती अधोरेखित होते. मोबाईलसारख्या आभासी जगातून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या ज्ञानसमृद्ध विश्वाकडे वळविण्याचे महत्त्वपूर्ण काम या वाचनकट्ट्याच्या माध्यमातून होत आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचा सहभाग लाभल्यास त्याचे व्यापक शैक्षणिक चळवळीत रूपांतर होऊ शकते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी शाळेत आजवर राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. वाचनकट्टा सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण व्हावी, आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे, स्वतःचे विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी आणि पुस्तकांशी त्यांचा संवाद अधिक दृढ व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल आणि मोबाईल माध्यमांच्या विळख्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्यांच्या मनात वाचनाविषयी जिज्ञासा, जाणिवा आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थी केवळ परीक्षेतच यशस्वी न होता जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हावेत, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

एकाच दिवशी चार उपक्रमांचा शुभारंभ

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात सिंधुछाया गृह राशी उद्यानाचे उद्घाटन, अन्नपूर्णा बाल पोषण स्वयंपाकगृहाचे भूमिपूजन आणि वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संवर्धन यांनाही महत्त्व देणारे हे उपक्रम शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; वाचनकट्ट्यासाठी देणगीचा हात

सध्या परिसरात असलेली दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच गरजू विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांना वस्तुरूपाने मदत करावी, असे आवाहन राजेश परजणे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विविध मान्यवरांनी वाचनकट्टा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.शाखा अभियंता राजेंद्र दिघे यांनी वाचनकट्टा उपक्रमासाठी ३१ हजार रुपये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा वरगुडे यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांसाठी १० हजार रुपये, माजी गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी ५ हजार रुपये, पंचायत समितीचे लेखाधिकारी संजय कोल्हे यांनी ५ हजार रुपये, तर सुनील सरोदे यांनी १ हजार रुपयांची देणगी रोख स्वरूपात दिली. या माध्यमातून लोकसहभागातून शैक्षणिक उपक्रमांना बळ देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.कार्यक्रमास लक्ष्मणराव साबळे, खंडू फेफाळे, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, संजय भाकरे, सोमनाथ निरगुडे, दिलीपराव ढेपले, राजेंद्र ढेपले, राजेंद्र निकम, पंढरीनाथ आबक, आण्णासाहेब तिरमखे, चंद्रकांत साबळे, लक्ष्मण बोरनारे, विजय परजणे, मधुकर शेटे, दत्तात्रय शेटे, बापू तिरमखे, अनिल आचारी, कृष्णा आबक, बाळासाहेब दहे, विजय कर्पे, सोमनाथ घेर, कारभारी भाकरे, बापूसाहेब गायकवाड, अविनाश गायकवाड, संदीप भाकरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे यांनी आभार मानले.

पुस्तकांशी मैत्री, विचारांना नवी दिशा आणि लोकसहभागातून शिक्षणाला बळ, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संवत्सर शाळेने ग्रामीण शिक्षणासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे. हा वाचनकट्टा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच उद्याची विचारशील पिढी घडविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!