थोरात परिवार वारकरी संप्रदायाचा पाईक- महंत रामगिरी महाराज
संगमनेर । विनोद जवरे ।
ऐतिहासिक जोर्वे संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या गावात आज श्रीदत्त मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन कार्यक्रमात हजारो भाविकांच्या उपस्थिती भक्तिमय झालेल्या वातावरणात म्हणजे जणू प्रति पंढरपूर निर्माण झाले होते. मानवता धर्म सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा असून थोरात परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक असल्याचे गौरवउद्गार सरला बेटाचे महंत ह भ प रामगिरी महाराज यांनी काढले आहे
जोर्वे येथे श्री दत्त मंदिराच्या सभामंडपाचा जिर्णोद्धार व संत सावली वस्तीवरील दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे ,आमदार मोनिकाताई राजळे, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीत सिंह देशमुख ,सौ दुर्गाताई तांबे ,सौ कांचनताई थोरात ,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीत थोरात, सौ सविताताई पारीख, ह भ प नवनाथ महाराज आंधळे ,सुरेश थोरात, सौ शरयूताई देशमुख, आदींसह जोरवे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व हजारो भाविक उपस्थित होते.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय पंडितराव थोरात यांच्या संकल्पनेतून संत सावली वस्तीवर नव्याने हेमाडपंथी दत्त मंदिराची सुरेख कलाकृती प्रवराकाठी उभी राहिली आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूला बाबाजी बाबा व ग्राम दैवताचे छोटे मंदिर आहे. . राजस्थानी दगडांमध्ये उभारलेल्या या मंदिरावर अत्यंत बारीक नक्षीकाम केलेले असून या मंदिराचा कळस हा 100 किलोचा आहे. मंदिरात श्री दत्त महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवाईनी परिसर नटला असून ही निसर्गरम्य वातावरण प्रत्येकाच्या मनाला शांती देणारे ठरले आहे. या भक्तीमय सोहळ्यात महंत रामगिरी महाराज आमदार बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात आला. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आल्या होत्या, घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या, तर दत्त मंदिर परिसर भक्ती भवाने नटला होता. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भावी भक्तगण मोठ्या आनंदाने उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना ह भ प रामगिरी महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा असून सर्व जात-पात धर्मभेद न पाहता सर्व समाजाला एकत्रित बरोबर घेऊन जाणारा हा माणुसकीचा धर्म आहे. आणि हीच समृद्ध परंपरा थोरात परिवाराने कायम जपली आहे .सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात ,स्वर्गीय पंडितराव थोरात ते आ. बाळासाहेब थोरात, इंद्रजीत थोरात, सौ दुर्गाताई तांबे या सर्वांनी ही परंपरा जोपासली आहे.थोरात परिवाराने व या परिसराने सरला बेट गुरुस्थानी मानले आहे. जोर्वे गावाला मोठी समृद्ध परंपरा असून आ. बाळासाहेब थोरात यांनी या गावचे नाव देश पातळीवर पोहोचवले असल्याचेही ते म्हणाले तर आमदार थोरात म्हणाले की, जोर्वे गाव व परिसर कायम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. दत्त महाराज हे सर्वांचे श्रद्धास्थान असून या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याने भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलणार आहे. स्वर्गीय पंडितराव तात्या थोरात यांच्या संकल्पनेतून संतसावली वस्तीवरील मंदिर सुद्धा अत्यंत भव्य दिव्य व आकर्षक निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले. याप्रसंगी मंदिराचे काम करणाऱ्या आर्किटेक बि आर. चकोर यांच्यासह सर्व कारागिरांचा आमदार थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भक्तिमय वातावरणात सर्व जोर्वे गाव व परिसर डुंबून गेला होता.