अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठाचा स्वररंग युवा महोत्सव संपन्न
29 कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठाचा स्वररंग युवा महोत्सव संपन्न
संगमनेर । विनोद जवरे ।
समाज आज एका अस्वस्थ अवस्थेतून जात असून प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ हवे असते. चांगले मानसिक स्वास्थ्य व तणावमुक्त राहण्यासाठी साहित्य, कला, संगीत, नृत्य या अविष्कारांची गरज असून अमृतवाहिनीने आयोजित केलेल्या या स्वररंग कार्यक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले असल्याचे गौरव उद्गार मा.आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलामंच येथे स्वररंग 2023 या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पुणे विद्यापीठाच्या संलग्न सर्व महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यावेळी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाचे डॉ अभिजीत कुलकर्णी, सदानंद भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, डॉ रमेश पावशे, समन्वयक प्रा विलास शिंदे, रजिस्टर प्रा विजय वाघे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ तांबे म्हणाले की ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तेमुळे देशात आपला लौकिक निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून पुणे विद्यापीठाच्या वतीने 29 कला प्रकारांच्या या स्वररंग मधून अनेक विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे.तर डॉ सदानंद भोसले म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा स्वच्छ परिसर हिरवाई याचबरोबर येथे असलेल्या सुविधा यामुळे हे महाविद्यालय विद्यार्थी व पालकांसाठी प्रथम पसंतीचे ठरले आहे नेक च्या ए प्लस हा गुणवत्तेचा दर्जा या महाविद्यालयाने मिळवला आहे.
तर डॉ.अभिजीत कुलकर्णी म्हणाले की, जीवनामध्ये कलाविष्कारांची जपवणूक केल्यास प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद निर्माण होतो .स्वररंग या महोत्सवात नाशिक अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सहभाग घेतला .यामध्ये जास्तीत जास्त बक्षीस मिळवणारे महाविद्यालय म्हणून नौरसजी वाडिया पुणे यांना विजेते तर केटीएचएम महाविद्यालय नाशिक यांना उपविजेते पद मिळाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश यांनी केले
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉ व्यंकटेश यांनी अभिनंदन केले आहे.
स्वर रंग मध्ये 29 कला प्रकारात घेतला विद्यार्थ्यांनी सहभाग
समूहगीत भारतीय समूह गायन, शास्त्रीय गायन ,उपशास्त्रीय गायन, स्वर वाद्य वादन, तालवाद्यवादन, पाश्चिमात्य वैयक्तिक गीत ,पाश्चिमात्य समूह गायन ,लोकवाद्यवृद्ध, वैयक्तिक नृत्य ,संकल्पना नृत्य, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री अभिनय, एकांकिका ,प्रहसन ,मुक्तातक, मूकनाट्य ,नकला, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा स्थळचित्र ,चिकट कला, कात्रण कला ,पोस्टर मेकिंग ,माती कला, व्यंगचित्र ,रांगोळी, मेहंदी स्थळ, छायाचित्र मांडणी, यामध्ये 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला..