आ.बाळासाहेब थोरात राज्याचे सुस्वाभावी नेतृत्व – रामदास फुटाणे
आरक्षण, जात व्यवस्था, राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य
आ.बाळासाहेब थोरात राज्याचे सुस्वाभावी नेतृत्व – रामदास फुटाणे
संगमनेर । विनोद जवरे ।
वारकरी संप्रदायाने सर्व जाती व समाजांना एकत्र आणले. मात्र आता राजकारणाच्या नावावर समाजांना व जातींना वेगळे केले जाणे दुर्दैवी आहे. राजकारणाचा सुवर्णकाळ महाराष्ट्राने अनुभवला असून सध्याचे चिखलफेकीचे राजकारण हे अशोभनीय असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणारे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुस्वाभावी नेतृत्व असल्याचे गौरव उद्गार ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी काढले असून सध्याची राजकीय परिस्थिती, आरक्षण, जात व्यवस्था यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन व प्रकट मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ सुधीर तांबे ,बाजीराव पा. खेमनर, शेतकरी कवी प्रा. भरत दौंडकर ॲड.आर बी सोनवणे, तुळशीनाथ भोर, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, सिताराम वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,प्राचार्य प्रा. व्ही.बी.धुमाळ, डॉ एम ए वेंकटेश, डॉ बाबासाहेब लोंढे ,डॉ मनोज शिरभाते, डॉ. संजय मंडकमाले, सौ जे बी शेट्टी, श्रीमती शीतल गायकवाड, अंजली कन्नावर,नामदेव गायकवाड प्रा. बाबा खरात प्रा. केशवराव जाधव, एसटी देशमुख, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ जे बी गुरव आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रामदास फुटाणे म्हणाले की, महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. मात्र सध्या आरोप प्रत्यारोप आणि होणारी चिखलफेक अत्यंत वाईट आहे. आरक्षणाच्या नावावर तेढ निर्माण होत आहे. सध्या मराठा समाजाचे आंदोलन हे एका समाजाचे नसून कोरडवाहू शेतकऱ्यांच्या गरीब पोरांचे आंदोलन ठरते आहे. केंद्राने जास्त आरक्षण देण्याची अधिकार राज्याला द्यावे. प्रत्येक समाजातील गरिबांना आरक्षण द्यावे. मात्र त्याला कालमर्यादा असावी. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला आहे. ज्यांनी काही काम केले नाही ते फक्त टीका करतात. जात ही मानवनिर्मित असून यावर परखड भाष्य करताना त्यांनी जात- जात नसते ही कविता सादर केली. तर सातव्या वेतन आयोगावर गाई मधील संवाद साधताना ते सातवा आयोग मागतात. तर आपण वाढीव चारा का मागू नये हे सांगताना सर्वांना खळखळून हसवले. कटपीस च्या कवितेला सर्वांनी भरभरून दाद दिली. तर भारतीय लोकशाही आणि संविधानावर सादर केलेल्या कवितेने प्रत्येकाच्या अंगावर शहर आणले. हलकेफुलके विनोद आणि जीवनातील अनुभव सांगताना ग्रामीण भागातील व्यथा मांडण्याचा आयुष्यभर कविता आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला असल्याचेही ते म्हणाले.
तर आमदार थोरात म्हणाले की, संगमनेरच्या प्रगतीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, तीर्थरूप सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, वसंत दादा पाटील ,डॉ अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वाटा आहे. ज्यांचे योगदान आहे त्यांच्या प्रति नेहमी कृतज्ञता आहे. त्याकाळी कोणतेही दळणवळणाचे साधन नसताना यशवंतरावांनी महाराष्ट्रातील माणसे हेरली .त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सहकार वाढविला. दुग्ध हरित क्रांती काढून प्रगतीची दिशा दिली. मात्र सध्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप हे वाईट आहेत. एक काळ होता की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सभागृहात जुगलबंदी चालायची. परंतु मैत्रीपूर्ण संबंध होते. परंतु सध्याचे राजकारण पाहून चिंता वाटते असेही ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की यशवंतराव चव्हाण यांची पंचायत राज व्यवस्थासह एमआयडीसीची निर्मिती केली. उत्तम साहित्यिक असलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यावेळी प्रा भारत दौंडकर यांनी गोफ व इतर कविता सादर करून अंगावर शहर आणले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा केशवराव जाधव यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्राचार्य विवेक धुमाळ यांनी आभार मानले यावेळी संगमनेर मधील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून स्मृती स्थळेसहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृत उद्योग समूहात इंदिरा गांधींचे शक्ति स्थळ, यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक यशवंत तीर्थ, तर वसंत दादा पाटील यांचे स्मारक वसंत तीर्थ निर्माण केले आहे .दरवर्षी या ठिकाणी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व विचारवंतांची व्याख्याने आयोजन करून या नेत्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जात असल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले असून हा दिशादर्शक उपक्रम राज्यभरात फक्त संगमनेर मध्येच असल्याचे कौतुक कवी रामदास फुटाणे यांनी केले आहे.