लोणीच्या फिजिओथेरपिस्टची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय सेवा


लोणीच्या फिजिओथेरपिस्टची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय सेवा

लोणी । प्रतिनिधी । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे लोणावळा येथील सिंहगड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सीनियर पुरुष फुटबॉल लीग स्पर्धेत, लोणी येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉक्टरांनी खेळाडूंना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिली असल्याची माहीती प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी दिली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आणि नामांकित फुटबॉल क्लबचे सुमारे १८० खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये इंडिया ऑन ट्रॅक, मुंबई एफसी, नाशिक युनायटेड यांसारख्या बलाढ्य संघांचा समावेश होता. खेळाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता, खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आणि दुखापत व्यवस्थापनासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या स्पोर्ट्स फिजिओथेरपी विभागातील डॉ. मोहित अग्रवाल आणि डॉ. प्रणव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.

स्पर्धेदरम्यान मैदानावर झालेल्या दुखापतींचे तत्काळ व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि खेळाडूंच्या जलद पुनर्वसनाची जबाबदारी या डॉक्टरांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या या सेवेचे क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे.प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी या कामगिरीबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन केले. ही सेवा स्पोर्ट्स फिजिओथेरपी विभागप्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या आयोजनासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. किरण चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभले.



