ब्रेकिंग

ध्येयपूर्तीसाठी योग, उद्योग आणि देव या त्रिसुत्रीच्या आधाराने वाटचाल केली तरच यश निश्चित – वाडेकर महाराज

ध्येयपूर्तीसाठी योग, उद्योग आणि देव या त्रिसुत्रीच्या आधाराने वाटचाल केली तरच यश निश्चित – वाडेकर महाराज

ध्येयपूर्तीसाठी योग, उद्योग आणि देव या त्रिसुत्रीच्या आधाराने वाटचाल केली तरच यश निश्चित – वाडेकर महाराज

कोपरगांव । प्रतिनिधी । जीवनात निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी योग, उद्योग आणि देव या त्रिसुत्रीच्या आधाराने जो वाटचाल करतो तोच यशस्वी होतो. त्यासाठी गुणवत्ता, कार्यक्षमता आणि पात्रता हे गुण माणसाजवळ असायला हवेत असे उद्‌गार चाळीसगांव येथील ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. विश्वनाथ महाराज वाडेकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनातून ” योग, उद्योग व देव ” या विषयावर ह. भ. प. वाडेकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर संवत्सर महानुभाव आश्रमाचे प. पू. नितीनबाबा महानुभाव, पाथरे आश्रमाचे प. पू. दामोदर बाबा महानुभाव, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी संचालक प्रमोदबापू पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, अरुणराव येवले, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, सौ. धनश्री विखे पाटील, मच्छिंद्र टेके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने ह. भ. प. वाडेकर महाराज, प. पू. उध्दव महाराज मंडलीक यांच्यासह उपस्थित मान्यवरांचासत्कार करण्यात आला.

योग आणि देव या दोन्हींचा संयोग मानवी जीवनाशी निगडीत आहे. शरीराला, मनाला आणि आत्म्याला एकत्र आणणारी ही प्राचीन पध्दत असल्याचे सांगून ह. भ. प. वाडेकर महाराज यांनी पुढे सांगितले की, योग ही मुळात आध्यात्मिक शिस्त आहे, जी सुक्ष्म विज्ञानावर आधारीत असून प्रत्येक क्रिया ही योगावर चालते. योगाचे व्यापक असे चार वर्गिकरण झालेले आहेत. त्यात कर्मयोग जिथे आपण शरीराचा वापर करतो. भक्तीयोग जिथे आपण भावनांचा वापर करतो. ज्ञानयोग जिथे आपण मन आणि बुध्दीचा वापर करतो. आणि क्रियायोग जिथे आपण उर्जेचा वापर करतो. उद्योगाविषयी बोलताना ह. भ. प. वाडेकर महाराज यांनी माणसाने हातात घेतलेला कोणताही उद्योग हा देव असल्याचे सांगितले. उद्योगासाठी भक्ती नव्हे तर उद्योगातून भक्ती साधता आली पाहिजे. कोणताही उद्योग व्यवसाय काताना नैतिकतेचे पालन करुन सामाजिक जबाबदारी स्वीकारण्यावर उद्योजकांचा भर असायला हवा. उद्योग असा निवडा की. पराजय झाला तरी आपलाच आणि विजय झाला तरी आपलाच हे ज्याला चांगले समजते तो यशस्वी होतोच.देव या संकल्पनेविषी वाडेकर महाराज यांनी ईश्वराचे स्वरूप कसे आहे हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. परंतु संपूर्ण विश्वाला संचलित करणारी आणि चराचरात वास करणारी ती एक अदृष्य शक्ती असल्याचे सांगून ज्यावर तुमची नितांत श्रध्दा आहे आणि जो तुमच्या हाकेला धाऊन येतो तो देव, देवाला ओळखण्यासाठी आपण मात्र आपली श्रध्दा लहान बाळासारखी ठेवायला हवी. श्रध्दा आणि ज्ञान एकमेकांच्या विरुध्द नाही. ते एकमेकांना पूरक असलेले आत्मविकासाचे टप्पे आहेत. ते ओलांडल्यानंतर देव, ब्रम्ह, चैतन्य, विश्वरचना याची प्रचिती माणसाला आल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे आपल्या मानण्या न मानण्यावर देवाचे अस्तित्व नाही. आपण मानले तर देव आहे आणि नाही मानले तरीही देव आहेच हे आपण मान्य केलेच पाहिजे असेही मार्गदर्शन ह. भ. प. वाडेकर महाराज यांनी केले.प. पू. उध्दव महाराज मंडलीक यांनी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अव्याहतपणे सुरु असलेल्या व्याख्यानमालेचे कौतुक करून अशा कार्यक्रमामधून विद्याथ्यांबरोबरच वयोवृध्दांना प्रेरणा मिळते. सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी अशा उ‌द्बोधक आणि प्रेरणादायी विचारांची आज नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले. महानंदचे माजी संचालक प्रमोदबापू पाटील यांचेही याप्रसंगी भाषण झाले. महिला महाविद्यालयाच्या ” कृपासिंधू ” नियतकालिकेचे प्रकाशन, संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय तसेच महिला महाविद्यालयातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप तर संवत्सरचे सहाणे टेलर यांच्यातर्फे जनता हायस्कुलमधील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी यांची मोठी उपस्थिती होती. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!