मानवी स्वभावातील चांगुलपणा व विसंगतीचे विनोदातून दर्शन घडते – प्रा. हंबीरराव नाईक

मानवी स्वभावातील चांगुलपणा व विसंगतीचे
विनोदातून दर्शन घडते – प्रा. हंबीरराव नाईक
मानवी स्वभावातील चांगुलपणा व विसंगतीचे
विनोदातून दर्शन घडते – प्रा. हंबीरराव नाईक
कोपरगांव । प्रतिनिधी । अनुरुप वातावरणाची निर्मिती, संवादाचा चटकदारपणा व विडंबनाचे कौशल्य उलगडून दाखविणे ही विनोदाची खास वैशिष्ट्ये असतात. विनोदातून केवळ काही ठरावीक समाजाचे दर्शन घडत नाही तर मानवी जीवनातील व स्वभावातील चांगुलपणाबरोबरच विसंगतीचेही दर्शन घडते असे उद्गार श्रीरामपूर येथील ज्येष्ठ विनोदी साहित्यिक व व्याख्याते प्रा. हंबीरराव नाईक यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले. आपल्या सहज विनोदी शैलीने प्रा. नाईक यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानातून ” हसण्यासाठी जीवन आपुले..” या विषयावर प्रा. नाईक सर बोलत होते. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी नाशिक पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह. आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, ज्येष्ठ कार्यकर्ते पदमाकांत कुदळे, ॲड. रवींद्र बोरावके, तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष अंबादास देवकर, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या सचिव सौ. मीरा काकडे, कोपरगांव तालुका लघू पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिलराव तांबे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीपराव दहे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडीतराव वाघिरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर संवत्सर महाविद्यालयाचे प्रा. युवराज सदाफळ यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने प्रा. हंबीरराव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
भाषेचे कृत्रिम वळण मोडून अगदी सहज, सरळ पध्दतीची भाषा विनोदी पध्दतीने वापरली की, रसिकांना त्यातून निखळ आनंद मिळतो असे सांगून प्रा. नाईक पुढे म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात विनोद नवनवीन शैलीत आणि विविध रुपातून प्रकट होऊन त्याचा विकास झालेला आहे. काही चांगल्या दर्जाचे विनोद जीवनदर्शनाच्या प्रेरणेतून व मूल्यनिष्ठेतून निर्माण झालेले असून कोटीरुप विनोदाचे काही चांगले नवे आविष्कार रंजनाच्या प्रेरणेतून प्रकट झालेले आहेत. विनोद निर्मितीला अत्यंत आवश्यक असलेली तरल कल्पनाशक्तीची देणगी, सुक्ष्म निरीक्षणशक्ती व उत्तम भाषाप्रभुत्व व्याख्यात्यांकडे असायला हवे. शिवाय शब्दांच्या वापरातील चोखंदळपणा, वाक्यरचनेतील सहेतुकता व एकंदर विनोद निर्मितीमागील परिश्रमशीलता ही वैशिष्ट्ये रसिकांच्या मनावर रुंजी घालतात. विनोदाचा निखळ व तरल आनंद रसिकांना घेता येतो.व्यापक सहानुभव, मानवतावादी दृष्टीकोन, जीवनसन्मुख मूल्यनिष्ठदृष्टी व निखळ विडंबन या बाबी ज्या विनोदात समाविष्ठ असतात ते विनोद श्रेष्ठ दर्जाचे ठरतात. उत्तम अशा गद्यशैलीमुळे असे विनोद श्रोत्यांपर्यंत सहज पोहोचतात. विनोदाला साधन आणि शस्त्र म्हणून पाहताना व्याख्याते त्याचा उपयोग वेळोवेळी राजकीय क्षेत्रासाठीही करतात. अनेक कथा, व्याख्यानातून राजकीय उपहासाला ठरावीक पातळीवरुन व्यापक पातळीवर नेण्याचे काम करताना कधी कधी विनोदाला शृंगाराची जोड देऊन रंजकता वाढविण्याचे कौशल्येही व्याख्याते वापरतात. काही वास्तवातील तर काही काल्पनिक घटना घेवून त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात दाखविले की, त्यातून निर्माण होणारे विनोद रंजनात्मक तर ठरतातच परंतु रंजन करता करताच मानवी जीवनव्यवहाराचेही दर्शन त्यातून दिसून येते, हा विनोदात्म शैलीचा एक महत्वाचा आविष्कार असल्याचेही मत प्रा. नाईक यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पद्माकांत कुदळे, राजेश परजणे यांचीही भाषणे झालीत. संवत्सर महाविद्यालयाच्या ‘ गोदानाम संवत्सरे ‘ या नियतकालिकेचे प्रकाशन, संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय तसेच कोपरगांव येथील नामदेवराव परजणे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप तसेच संवत्सरचे सहाणे टेलर यांच्यातर्फे संवत्सर कॉलेज व कोपरगांव येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी विद्यार्थीनी यांची मोठी उपस्थिती होती. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.