ब्रेकिंग

दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !

डॉ. सुजय विखे : संवत्सर येथे 210 दिव्यांग, वयोवृद्धांना सहाय्यक साहित्य वाटप

दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !

दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !

डॉ. सुजय विखे : संवत्सर येथे 210 दिव्यांग, वयोवृद्धांना सहाय्यक साहित्य वाटप

कोपरगाव । प्रतिनिधी । देशातील दिव्यांगांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योजना आणली या योजनेच्या माध्यमातून देशातील दिव्यांग, वयोवृद्धांना सहाय्यक साधने वाटपासाठी बजेटमध्ये एका वर्षाकरिता 70 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच वर्षात 45 कोटी रुपयांची सहाय्यक साधने आणणारा देशातील एकमेव खासदार ठरलो आणि त्याच माध्यमातून सर्वाधिक चाळीस हजार लाभार्थ्यांना साहित्य वाटप करणारा अहिल्यानगर जिल्हा हा देशात प्रथमस्थानी राहिला आहे. असे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.


कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे लोकनेते स्वर्गीय नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर परिसरातील 210 दिव्यांग, वयोवृद्धांना प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर यांच्यामार्फत सहाय्यक साधनांचे रविवारी (दि.22) वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. विखे पाटील अध्यक्षस्थानाहुन बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, अहिल्यानगर प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे कनिष्ठ व्यवस्थापक व नोडल अधिकारी कमलेश यादव, टर्शियरी सुपर स्पेशालिटी सेंटर व्यवस्थापक डॉ. अभिजित मेरेकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. दीपक अनाप, आदिनाथ ढाकणे, सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे,तसेच विखे पाटील हॉस्पिटल, ऍलिमको (ALIMCO), संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा दिव्यांग केंद्राचे सर्व अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.यावेळी राजेश परजणे यांच्या संकल्पनेतून संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 21 विद्यार्थिनींचा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पहिला हप्ता भरण्यात आला तसेच नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून कोमल अरुण कानडी हिने (७१.१७) टक्के, वाणिज्य शाखेतील वैशाली कचेश्वर खिलारी व पठाण परवेज इसरारखान (६९.३३), कला शाखेतील पायल संजय खटकाळे (७१.१७) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विखे पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करतो. वयाच्या साठ वर्षानंतर त्यांचे जीवनमान कसं असेल, आर्थिक परिस्थितीमुळे सहाय्यक साधने घेणे शक्य होत नसेल, याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारकाईने विचार करून ही योजना आणली आहे आणि आज याच योजनेच्या माध्यमातून देशभरात मोठे काम होत आहे. विविध योजना राबविण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू राहतील. तसेच संवत्सर गावामध्ये प्रत्येकापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा शब्द दिला.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसरपंच विवेक परजणे म्हणाले, विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय उपचाराची मदत असेल, संवत्सर येथे सुरू असलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती असेल, उभारण्यात आलेल्या नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य असेल, वयोश्री योजना दिव्यांग योजनेतून गरजवंतांना साहित्य वाटप असेल यासाठी कोपरगाव तालुक्यावर विखे पाटील परिवाराचे नेहमी सहकार्य राहिले आहे. आणि त्याच माध्यमातून या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला बारा हजार रुपयांपर्यंतची साहित्यांची मदत करता येते. त्या माध्यमातून संवत्सर परिसरातील 210 लाभार्थ्यांना एकूण 1155 साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यांची एकूण किंमत 16 लाख 34 हजार 228 रुपये इतकी आहे. यापूर्वी 2023 मध्ये 79 दिव्यांग लाभार्थ्यांना साडेपाच लाख रुपयांचे साहित्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी कार्ड महत्त्वपूर्ण आहे. ते काढण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एकच वार असतो. एकच दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्याचबरोबर काहींना तेथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांची गैरसोय लक्षात घेता. आपल्या माध्यमातून संवत्सर येथे कॅम्प घेण्याची परवानगी मिळून द्यावी असेही परजणे यावेळी म्हणाले.


आभार प्रदर्शनाप्रसंगी राजेश परजणे म्हणाले, देशात दिव्यांग व वयोश्री योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. सुजय विखे यांचा प्रथम क्रमांक राहिला आहे. सुजय विखे यांच्या माध्यमातून विखे परिवाराची चौथी पिढी ही जनसेवेसाठी यशस्वीरित्या काम करत आहे. यातूनच जनतेचे विखे परिवारावर किती प्रेम आहे हे लक्षात येते. खासदारकीच्या पराभवानंतर अवघ्या काही दिवसातच पुनश्च एकदा कामाला लागून सुजयवर जनतेचे असलेले प्रेम जनतेने दाखवून दिले आहे. दरम्यान या कॅम्पसाठी डॉ. अभिजित दिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोपरगावात संघटनेची बांधणी करणार…

कोपरगाव तालुक्यात अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर बोलणे अपेक्षित आहे. त्याला वाचा फोडणे अपेक्षित आहे. परंतु; दुर्दैवाने यावर बोलल्या जात नाही. परंतु या पुढील काळात असे होणार नाही कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात मोर्चे बांधणी करून तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन सर्वसामान्यांचे, प्रश्न सोडवण्यासाठी राजेश परजणे व आम्ही प्रयत्नशील राहू असेही डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.

 

या साधनांचे केले वाटप…

वयोश्री योजनेच्या माध्यमातून श्रवणयंत्र, मानेचा पट्टा, कमोड चेअर, वॉकर, गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन कुशन, पाठीचा आधार पट्टा, तीन व चार पायाची काठी, साधी काठी, ऍडजेस्टेबल काठी, शीटसहित काठी, व्हीलचेअर, कमोड व्हीलचेअर तसेच दिव्यांग योजनेच्या माध्यमातून बॅटरी चलीत तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, तीन चाकी सायकल, ब्रेल किट, व्हीलचेअर मोठी, व्हीलचेअर या सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!