नारीशक्ती वंदन विधेयकामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार – शालिनीताई विखे पाटील

नारीशक्ती वंदन विधेयकामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार – शालिनीताई विखे पाटील


या विधेयकाच्या पाठबळामुळे सर्वच क्षेत्रांत नेतृत्व करण्याची मोठी संधी महिलांना मिळणार
राहाता । प्रतिनिधी । “तुमच्या मनगटात बळ आहे, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाचे पाठबळ महिलांच्या पाठीशी उभे केले आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, तिथे स्वतःला कधीही कमी लेखू नका; उलट अधिक ज्ञान मिळवण्यासाठी सातत्याने पुढे जात राहा. गावापासून ते देशापर्यंतच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची मोठी संधी आता महिलांना उपलब्ध झाली आहे,” असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.

संसदेत मांडण्यात आलेल्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकास पाठिंबा देण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘नारीशक्ती वंदन महिला संमेलना’त त्या बोलत होत्या. सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनास अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना सौ.विखे पाटील म्हणाल्या की, “संकटाला सामोरे जाण्याची शक्ती महिलांमध्ये उपजतच आहे. मात्र, अधिक प्रगती करायची असेल, तर अनुभव घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. नारीशक्ती वंदन विधेयकामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार आहे. ‘चूल आणि मूल’ या चक्रात अडकलेली महिला आता आपल्या मनगटातील बळावर अधिक जिद्दीने पुढे जाईल.या विधेयकाच्या पाठबळामुळे सर्वच क्षेत्रांत नेतृत्व करण्याची मोठी संधी महिलांना मिळणार आहे.” जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर, अनुभव घेत आपण स्वतःला सिद्ध केल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, “राजकारण विरहित विकास प्रक्रिया आणि जातीभेदाच्या पलीकडे जाऊन विचार केल्यामुळेच समाज आपल्या पाठीशी उभा राहतो. अशाच पद्धतीने आपण सर्वांनी काम करावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय लोकशाही परंपरेत महिलांना मिळालेले स्थान खूप मोठे आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार देणारा आपला देश एकमेव होता. इतर देशांमध्ये महिलांना मतदानाचे अधिकार मागून घ्यावे लागले. २०१४ सालापासून देशात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे विविध योजनांच्या माध्यमातून महिलांची विकास प्रक्रियेतील भागीदारी वाढली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता त्यापुढे एक पाऊल टाकून, कायद्याच्या निर्मितीमध्ये महिलांना स्थान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या विधेयकातून घेतला आहे. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची मोठी संधी यातून महिलांना मिळणार आहे.”या संमेलनात नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, भाजपच्या प्रदेश सचिव गीता गिल्डा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्षा उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी हात उंचावून आणि घोषणा देऊन या ऐतिहासिक विधेयकास उत्स्फूर्त समर्थन व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपच्या प्रदेश सचिव गीता गिल्डा यांनी केले.



