ब्रेकिंग

राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश; डॉ. सुजय विखे पाटलांची डॉ. कल्याणी आरणे यांच्या घरी सदिच्छा भेट

शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास मी तयार - डॉ. कल्याणी आरणे

राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश; डॉ. सुजय विखे पाटलांची डॉ. कल्याणी आरणे यांच्या घरी सदिच्छा भेट

शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास मी तयार – डॉ. कल्याणी आरणे

शिर्डी । प्रतिनिधी । नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांनी स्थानिक राजकारणात एक सकारात्मक आणि घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत विरोधात उभ्या राहिलेल्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत संवाद आणि सहकार्याचा नवा संदेश दिला.

या भेटीत डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, राजकारण हे वैयक्तिक द्वेषासाठी नसून विकासासाठी असते. प्रचारादरम्यान डॉ. आरणे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा उल्लेख केला होता, याचा संदर्भ देत त्यांनी समविचारी व्यक्तींना पुन्हा एकत्र आणणे ही संघटनात्मक जबाबदारी असल्याचे नमूद केले. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक राजकारण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच, सामान्य कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात आणि राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या प्रवासाचे त्यांनी कौतुक केले. समाजातील कष्टकरी घटकांमधून नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची ताकद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा अधिक मजबूत होत असल्याचा उल्लेखही यावेळी डॉ विखे यांनी केला.डॉ. कल्याणी आरणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “दादा” अचानक घरी आल्याने आश्चर्य वाटले, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार पाहुण्याचे आदरातिथ्य करत त्यांनी जेवणाचा आग्रह केला. मोठ्या पदावर असूनही डॉ. विखे यांनी घरच्या साध्या जेवणाचा स्वीकार केल्याबद्दल त्यांनी त्यांच्या साधेपणाचे विशेष कौतुक केले.

या भेटीत केवळ औपचारिकता न राहता नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान समोर आलेले विकासाचे मुद्दे त्यांनी मांडले असून, ते मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राजकीय भूमिकेबाबत बोलताना डॉ. आरणे यांनी भारतीय जनता पक्ष हा विचारधारेवर चालणारा आणि संस्कृती जपणारा पक्ष असल्याचे सांगितले. शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भाजप एकच आहे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी भविष्यातील सहकार्याचे संकेत दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!