
संवत्सर जिल्हा परिषद शाळा एक आदर्शवत उपक्रमशील शाळा


संवत्सर जिल्हा परिषद शाळा एक आदर्शवत उपक्रमशील शाळा
कोपरगाव । विनोद जवरे । तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद शाळा एक उच्च दर्जाची गुणवत्ता आणि अत्यावश्यक भौतिक सुविधांमुळे संवत्सर जिल्हा परिषदेच्या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण केलेला आहे. सुसज्ज आणि भव्य प्रवेशद्वार.. शाळेच्या संपूर्ण परिसराला संरक्षण भिंत.. भिंतीवर व इमारतीवर मुलांना मागदर्शक ठरावे असे रंगकाम केलेले आहे. शाळेचा परिसर विस्तीर्ण असून स्वच्छ, सुंदर, हरीत, वृक्ष वेलींनी अतिशय आकर्षक असा आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच विद्यार्थ्यांचे सुंदर शिल्प लक्ष वेधून घेते.

शाळेच्या आवारात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद ओपन सायन्स पार्क, परसबाग, राशी उद्यान, बालवाटिका, सौरउर्जा प्रकल्प, संपूर्ण इमारतीचे रेन वॉटर हार्वेस्टींग, विज्ञ गान प्रयोगशाळा, बालस्नेही बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) सभागृह, हँडवॉश स्टेशन, संगणक प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात इंटर अॅक्टीव्ह बोर्ड, टॅब सुविधा, मुलांसाठी सुसज्ज ग्रंथालय, सर्व सुविधांनी युक्त असा डायनींग हॉल, व्यासपीठ, खेळांसाठी विस्तीर्ण मैदान, ओपन जीम, स्वच्छतागृहे अशा सर्व सुविधा कार्यान्वित आहेत. शाळेच्या आवारात वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, बॉटनिकल गार्डन अशा उपक्रमाबरोबरच परसबागेत भाजीपाला, फळ झाडांची लागवड करुन उत्पन्न घेतले जाते.

सन १९०८ पासूनचे डिजिटल दाखले शाळेत जतन करुन ठेवलेले असून ते एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आलेली आहे. शाळेतील पाला पाचोळ्यापासून गोबर गॅस, गांडूळ खत, सेंद्रिय खत निर्मिती करुन ते परसबागेसाठी वापरले जाते. पहिलीतील विद्यार्थी तीन अंकापासून पुढील बेरीज वजाबाकी संख्येवरील क्रिया करतात. तर दुसरीमधील विद्यार्थी चार अंकी संख्यावरील क्रिया करतात. हे इतरत्र कुठेही आढळून येत नाही. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा..’ या योजनेत शाळेने सलग दोन वर्षे विभाग स्तरावरील पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. शिक्षण विभागाकडून राज्यातील ३६ शाळांची एज्युकेशन दुरसाठी निवड करण्यात आलेली असून त्यात संवत्सर जिल्हा परिषद शाळेचाही समावेश आहे.

शाळेच्या विकासात राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचे सतत मार्गदर्शन असते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांचा शाळेच्या विकासासाठी व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु असतो. गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांचेही शाळेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान लाभलेले आहे. शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांची विवेकशीलता व कार्यतत्परता मुलांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच शाळेच्या लौकीकात अधिक भर टाकणारी आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समन्वयातून संवत्सरची ही शाळा आज राज्यातील इतर शाळांसाठी प्रेरक ठरेल हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे नक्कीच ही शाळा एक आदर्शवत शाळा आहे.



