आरोग्याची वेळेवर तपासणी व योग्य उपचार गरजेचे – आ. आशुतोष काळे
माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कान-नाक-घसा तपासणी शिबिर संपन्न

आरोग्याची वेळेवर तपासणी व योग्य उपचार गरजेचे – आ. आशुतोष काळे

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कान-नाक-घसा तपासणी शिबिर संपन्न
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव विधानसभा मतदासंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व गर्जे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कान, नाक व घसा संबंधित आजारांच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते बुधवार (दि.१९) रोजी सकाळी १० वा. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मवीर शंकरराव काळे सहकार सभागृहात पार पडले. यावेळी ते म्हणाले की, कान, नाक आणि घसा हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे अवयव असून दैनंदिन जीवनातील अनेक संवेदनशील क्रियांशी त्यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे या अवयवांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. किरकोळ त्रास वाटत असला तरी तो वारंवार होत असल्यास वेळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी आजारांचे निदान आणि उपचार झाल्यास गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिराचे केलेले आयोजन कौतुकास्पद बाब आहे. गरजू नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्यक असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेऊन कान, नाक व घसा आणि इतर आजारांच्या बाबतीतही जागरूक राहावे जेणेकरून मोठ्या आजाराचा आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासण्या कराव्या आणि शरीराची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच उपयुक्त वैद्यकीय सल्ला मिळाल्याने रुग्णांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.

यावेळी कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. पूजा वरद गर्जे व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून कान, नाक व घसा संबंधित विविध आजारांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन केले. या शिबीराचा परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार, आणि ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लाभधारकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.यावेळी डॉ. अजय गर्जे, डॉ. वरद गर्जे, डॉ. नकुल गर्जे, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. दत्तात्रय कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, प्रशांत घुले, विष्णुआबा शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदिप शिरसाठ, कारखाना आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश जैन, मुख्य लेखा अधिकारी वैभव काळे, चिफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, कामगार अधिकारी दिपक निंबाळकर, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



