ओव्हरफ्लोचे पाणी सिंचनासाठी द्या आ.आशुतोष काळेंची जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी

ओव्हरफ्लोचे पाणी सिंचनासाठी द्या आ.आशुतोष काळेंची जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी


ओव्हरफ्लोचे पाणी सिंचनासाठी द्या आ.आशुतोष काळेंची जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव मतदार संघात मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून खरीप पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघात पावसाळा सुरू झाल्यापासून अडीच महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जो काही पाऊस झाला त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तूर, कापूस आदी पिके उभी केली आहेत. जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने सर्व पिकांना मोठा आधार मिळाला व सर्व पिके जोमात होती. परंतु ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून कोपरगाव मतदार संघात पाऊस पडलेला नाही त्यात उन्हाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे पिकांना उन्हाचा चटका बसू लागला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तूर, कापूस आदी पिके धोक्यात आली आहे.सध्या गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे त्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून या खरीप पिकांना तातडीने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत तसेच वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात खाली पाणी सोडण्यात आल्यामुळे जायकवाडी धरण देखील जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.त्यामुळे सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.



