पिपाडांनी साकुरी ग्रामपंचायतीत निवडून येऊन दाखवावे
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांचे पिपाडा यांना जाहीर आव्हाण

पिपाडांनी साकुरी ग्रामपंचायतीत निवडून येऊन दाखवावे


भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांचे पिपाडा यांना जाहीर आव्हाण
राहाता । प्रतिनिधी । जो व्यक्ती फक्त विखे पाटील यांच्यावर टीका करून आपला प्रपंच चालवतो, ठेकेदारांकडून पैसे गोळा करतो, विखे पाटलांच्या विरोधात १५०० मते पडली असे म्हणणाऱ्याने साकुरी ग्रामपंचायतीत निवडून येऊन दाखवावे, असा जोरदार टोला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी राजेंद्र पिपाडा यांना लगावला.राजेंद्र पिपाडा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडीओद्वारे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेचा समाचार आज शिंदे यांनी घेत पिपाडा यांच्यावर पलटवार केला आहे.

शिंदे म्हणाले की, पिपाडा यांचा प्रपंच फक्त विखे पाटील यांच्यावर टीका केल्यामुळेच चालत आहे. ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात हे व्यस्त आहेत. पिपाडा यांच्या घरातील कोणताही सदस्य त्यांच्या बरोबर नाही. कुख्यात गुंड दीपक पोकळेही याचाच पित्या असून, पोकळेबरोबर याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे म्हणाले.राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी पिपाडा यांच्या बरोबर कोणीच नाही, हे लक्षात आल्यावर तसेच आपण निवडूनच येणार नसल्याची खात्री आल्यावर राजेंद्र पिपाडा परिवारासह राहाता येथून गायब झाले.पिपाडा यांनी सचिन शिंदे यांच्यावर वाळू धंद्याविषयी टीका केली, त्यालाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. मी एक शेतकरी असून, माझे कोणतेही वाळूचे धंदे नाहीत किंवा मी ठेकेदारांकडून पैसेही वसूल करीत नाही. उलट पिपाडा यांना बोलण्याची स्क्रिप्ट कोणत्या तालुक्यातून येते, हे जनतेला माहीत आहे. पिपाडा यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. जनतेसाठी पिपाडा यांनी एकही काम केलेले नाही,” असे शिंदे म्हणाले.पिपाडा यांनी माझ्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला, तो त्यांच्या गैरसमजुतीतून आहे. काय खरे आणि काय खोटे, हे न्यायालयात सिद्ध होणार असून, माझा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर विश्वास असून, सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे शिंदे म्हणाले.दीपक पोकळेवर बोलतो; परंतु वास्तविक स्थिती जनतेला माहिती आहे. हाच दीपक पोकळे काही दिवसांपूर्वी पिपाडा यांचा भागीदार होता. आर्थिक व्यवहारातील वाद झाल्यामुळे तुझे दोन नंबरचे पैसे बंद झाले. तसेच दीपक पोकळे हा तुरुंगात असल्यामुळे व तो आता उत्तर देऊ शकत नसल्यामुळे त्याचे नाव जोडतोय. तुझ्या या सर्व कारनाम्यांची सीडी तयार आहे. ती लवकरच प्रसारित होईल, याची काळजी करू नको.आपल्याला विधानसभेला विखे पाटील यांच्या विरोधकांकडून आर्थिक रसद घेऊन १५०० मते पडली. तुझ्या प्रचाराला जे रोजाने लोक होते, ज्या रिक्षा होत्या, त्यांचे पैसे तू बुडविले, हेसुद्धा जनतेला माहीत आहे, अशी टीका सचिन शिंदे यांनी केली.



