के. जे. सोमैया महाविद्यालयात देशभरातील संशोधकांचा ज्ञानकुंभ; १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान ‘स्टार कॉलेज’ची राष्ट्रीय आढावा बैठक

के. जे. सोमैया महाविद्यालयात देशभरातील संशोधकांचा ज्ञानकुंभ; १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान ‘स्टार कॉलेज’ची राष्ट्रीय आढावा बैठक


के. जे. सोमैया महाविद्यालयात देशभरातील संशोधकांचा ज्ञानकुंभ; १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान ‘स्टार कॉलेज’ची राष्ट्रीय आढावा बैठक
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, केंद्र सरकारच्या डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत ‘स्टार कॉलेज सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या टास्क फोर्सची समन्वयक बैठक व सातवी आढावा बैठक’ दि. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील बैठकीसाठी के. जे. सोमैया महाविद्यालयाची यजमान संस्था म्हणून निवड झाली आहे.

याबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी सांगितले की, डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्राम हा केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, उच्च दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयांना सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.यावर्षीच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे यजमानपद के. जे. सोमैया महाविद्यालयाला मिळणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ही बैठक हायब्रीड स्वरूपात आयोजित करण्यात आली असून देशभरातून सुमारे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बैठकीत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे सुमारे २० टास्क फोर्स सदस्य व प्रतिनिधी, तसेच स्टार कॉलेजमधील सुमारे ८० प्रतिनिधी आपल्या संशोधन प्रकल्पांची प्रगती आणि त्यातून झालेल्या निष्पत्तीचे पोस्टर्स सादर करणार आहेत. यासोबतच विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन आणि संशोधनविषयक चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.या बैठकीत स्टार कॉलेज प्रोग्रामअंतर्गत सहाय्य प्राप्त महाविद्यालयांचा संशोधन प्रवास, यशस्वी उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यपद्धती आणि त्यांचा झालेला प्रभाव यावरही चर्चा होणार आहे. देशभरातील सुमारे २५० प्राध्यापक समन्वयक व संबंधित घटक या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत सहभागी होणार आहेत.यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त मा. संदीप रोहमारे यांनी सांगितले की, स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या टास्क फोर्सची ही महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे.ही बैठक केवळ संशोधनाच्या प्रगतीचा आढावा घेणारी नसून, ज्ञानाचे आदान-प्रदान, उत्कृष्ट कार्यपद्धतींचा प्रसार, नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना आणि डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्रामची उद्दिष्टे अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी आढावा बैठकीचे संयोजक डॉ. शंकरैया कोंडा यांचीही उपस्थिती होती.



