कल्याणमध्ये सापळा, पळण्याचा प्रयत्न अन् शिर्डी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याणमध्ये सापळा, पळण्याचा प्रयत्न अन् शिर्डी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याणमध्ये सापळा, पळण्याचा प्रयत्न अन् शिर्डी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
शिर्डी । प्रतिनिधी । शिर्डी शहरातील बहुचर्चित महिला अत्याचार प्रकरणातील गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर शिर्डी पोलिसांनी कल्याण येथून जेरबंद केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईल लोकेशनचे विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी यशवंत जयराम पाटील (वय ४२, रा. आडीवली, कल्याण) याला ताब्यात घेतले. आरोपी व्यवसायाने पंचकर्म आयुर्वेद डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिर्डी पोलीस ठाण्यात सन २०२३ मध्ये गु.र.नं. ४४६/२०२३ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३७६ व ३७७ अंतर्गत एका महिलेने गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल केली होती. उपचाराच्या बहाण्याने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. या प्रकरणात यशवंत पाटील याचे नाव आरोपी म्हणून समोर आले होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पलायन केले. त्याने मोबाईल बंद केला तसेच घर आणि दवाखाना बंद करून तो भूमिगत झाला. गेल्या तीन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. विविध ठिकाणी शोधमोहीम आणि छापे टाकण्यात आले; मात्र प्रत्येक वेळी आरोपी पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच निसटत होता.
तांत्रिक तपासातून मिळाला ठावठिकाणा
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि पोलीस कॉन्स्टेबल अंजय अंधारे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने पारंपरिक पद्धतीने शोध घेण्याबरोबरच तांत्रिक तपासावर भर दिला. मोबाईल टॉवर लोकेशन, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली परिसरात आडीवली येथे नाव व वेश बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आडीवलीत सापळा अन् आरोपी ताब्यात
माहिती मिळताच शिर्डी पोलिसांचे पथक तातडीने कल्याणकडे रवाना झाले. स्थानिक मानपाडा पोलिसांच्या मदतीने आडीवली परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपीला पोलिसांच्या कारवाईची कल्पना नसल्याने तो सहजपणे पोलिसांच्या हाती लागला.पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि पोलीस कॉन्स्टेबल अंजय अंधारे यांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास शिर्डी येथे आणण्यात आले आहे.
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शोधाला अखेर यश
महिला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात आरोपीकडून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येते का, तसेच तपासातून आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.



