सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदू दे – डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदू दे, अशी प्रार्थना संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी लोणावळा येथील कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या चरणी केली.
लोणावळा येथे युवक काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष राजू गवळी, नगरसेवक निखिल कविस्वर, नवनाथ शिंदे, शेखर भाऊ मालपुरे, संकेत शिंदे, सचिन शिंदे, आदित्य पाळेकर, किरण शिंदे, शिल्पा गुंजाळ, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक मुकेश परमार आणि नगरसेवक अनिल गवळी उपस्थित होते. याप्रसंगी एकविरा देवस्थानच्या वतीने डॉ.जयश्रीताई थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सध्या समाजामध्ये वाढत असलेली अस्वस्थता आणि सामाजिक तणाव ही चिंतेची बाब आहे. दीपावली हा आनंद, मांगल्य आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. या मंगलमय पर्वात प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद निर्माण व्हावा, समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव वाढावा, अशी प्रार्थना आपण आई एकविरा देवीकडे केली आहे.त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य हेच खरे धन असून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. सध्या विविध आजारांचे वाढते प्रमाण हा समाजाच्या चिंतनाचा विषय आहे. यासाठी सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांनीही आरोग्यविषयक जनजागृती व प्रबोधनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विशेषतः महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे. महिला निरोगी असतील तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते. त्यामुळे महिलांनी कुटुंबाची काळजी घेतानाच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष राजू गवळी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील पुरोगामी आणि संतविचारांचा वारसा जपणारे नेतृत्व आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या नेतृत्वाचा सर्व समाजात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांत आदर केला जातो. डॉ.जयश्रीताई थोरात यांनीही त्यांचा सामाजिक आणि वैचारिक वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. संगमनेर तालुक्याला असे सुसंस्कृत नेतृत्व लाभले हे तालुक्याचे भाग्य आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.यावेळी त्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या परिसराला केलेल्या विविध मदतीच्या आठवणींनाही उजाळा दिला.