अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचा जिल्हाभर धडाका; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे!
जुगार, अवैध दारू आणि गुटखा विक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; २ लाख ३ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त, १६ गुन्हे दाखल

अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचा जिल्हाभर धडाका; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे!

जुगार, अवैध दारू आणि गुटखा विक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; २ लाख ३ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त, १६ गुन्हे दाखल
अहिल्यानगर । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार मोहीम हाती घेतली असून, एकाच दिवशी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल १६ ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जुगार, अवैध दारू विक्री आणि गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल २ लाख ३ हजार ३३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष नियोजन करून पाच स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानुसार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कर्जत, तोफखाना, राहुरी, पारनेर आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान जुगार अड्डे, अवैध दारू विक्रीची ठिकाणे तसेच गुटखा विक्री करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. पाच पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
कर्जतमध्ये सर्वाधिक तीन प्रकारच्या कारवाया
या कारवाईमध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचा एक गुन्हा दाखल करून ४३ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध दारू विक्रीचे दोन गुन्हे दाखल करून ८ हजार ९७० रुपयांचा आणि गुटखा विक्रीचा एक गुन्हा दाखल करून १३ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचा एक गुन्हा दाखल करून ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचा एक गुन्हा दाखल करून ४४ हजार ६९० रुपयांचा, तर अवैध दारू विक्रीचे चार गुन्हे दाखल करून २१ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीचे तीन गुन्हे दाखल करून ७ हजार ७५० रुपयांचा, तर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे दाखल करून २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका कायम
या संपूर्ण मोहिमेत जुगाराचे तीन, अवैध दारू विक्रीचे बारा आणि गुटखा विक्रीचा एक असे एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने आखलेल्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, प्रताप देवकाते, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, अजिनाथ पाखरे, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, पंकज व्यवहारे, अमृत आढाव, विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर, अतुल लोटके, विष्णू भागवत, अमोल आजबे आणि प्रकाश मांडगे यांनी सहभाग घेतला.जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही एकाच दिवसातील मोठी कारवाई असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर पोलिसांकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाण्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहेत.



