शेतीला विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज- आ.आशुतोष काळे

शेतीला विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज- आ.आशुतोष काळे


कर्मवीर कृषी महोत्सव २०२६ चे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न
कोपरगांव । प्रतिनिधी । चालू वर्षी दुष्काळामुळे पाण्याची टंचाई जाणवणार असून पुढील सहा ते आठ महिने कसे जातील याची चिंता भेडसावत आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.अशा परिस्थितीत या अडचणी दूर करण्यासाठी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतीला विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. हि गरज कर्मवीर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोळपेवाडी येथे गौतम पब्लिक स्कूलच्या प्रशस्त मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव २०२६ चे उद्घाटन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी दिलखुलासपणे संवाद साधतांना सांगितले की, शासनाच्या सेवेत असतांना शेतकरी आणि साखर कारखानदारीच्या बाबतीत घेतलेल्या अनेक निर्णयामुळे शेतकरी आणि साखर कारखाना दोघांचाही फायदा झाला.शेती झपाट्याने बदलत असून पुढील पिढी शेती करेल का? प्रश्न मनाला पडत असला तरी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहे. शेती संशोधनाचा वेग कमी असून दुर्दैवाने छोट्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधन होत नाही.तरी देखील शेतकऱ्यांनी उपलब्ध नवतंत्रज्ञानाचा शेतीत प्रयोग करून कष्ट कसे कमी होतील याचा प्रयत्न करावा.प्रीसिजन फार्मिंगचा मोठ्या प्रमाणावर उपयोग आपल्या राज्यात आणि देशात व्हायला हवा. पाण्याचा एक एक थेंब अतिशय महत्वाचा असल्याने पाणी जपून वापरावे.परदेशात अतिशय आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. परदेशात एआय तंत्रज्ञान, आधुनिक मशिनरी आणि सूक्ष्म नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अतिशय सोप झालेलं असून कर्मवीर कृषी महोत्सवासारख्या उपक्रमातून शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल ओळख होणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.प्रशासकीय सेवेत असतांना ग्रामीण भागात शेतीच्या बांधावरून आणि जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद मोठ्या प्रमाणावर असल्याचे मी अनुभवले आहे. अनेकदा काही फुटांच्या जमिनीवरून शेतकरी वर्षानुवर्षे न्यायालयात लढत राहतात. अनेकदा वादाचा निकाल लागेपर्यंत पिढी बदलते, पण प्रश्न तसाच कायम राहतो.यात शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि मानसिक स्वास्थ्य खर्ची पडते, तर कुटुंबातील नातेसंबंधही दुरावतात. त्यामुळे असे वाद कोर्ट-कचेरीत नेण्यापेक्षा आपापसात सामंजस्याने सोडविणे गरजेचे आहे. जमिनीच्या बांधावरून वाद वाढविण्यापेक्षा माणसांमधील नात्यांचे बांध टिकवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.आमदार आशुतोष काळे म्हणाले की,कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले.सहकार, शेती, शिक्षण आणि सामाजिक विकासाचा समन्वय साधून ग्रामीण प्रगतीचा पाया रचला.त्यांनी त्या काळातही शेतकऱ्यांना देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शेतीपूरक उद्योग व्यवसाय यांची माहिती व्हावी यासाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची दिशा दाखविली.त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन ही त्यांच्या विचारांना आणि कार्याला वाहिलेली खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिनार कुदळे, सर्व संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद —-
कर्मवीर कृषी महोत्सवात ग्रिनीज बुकात नोंद झालेली २.०८ फुट उंचीची राधा म्हैस, प्रती दिन ३८ ते ४० लिटर दुध देणारी संकरित गाय, पुंगनूर जातीची गाय, आर बी बोर जातीचे शेळी, बोकड, त्याबरोबरच अत्याधुनिक शेती मशागत औजारे, विविध प्रकारचे आधुनिक व इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, फवारणी ड्रोन व फवारणी यंत्र,विविध प्रकारच्या सिंचन साहित्य प्रणाली, विविध प्रकारचे दुध काढणी यंत्र, कुट्टी मशीन,नामंकित कंपन्यांचे मल्चिंग पेपर, सोलर, कृषी पंप,जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी झटका मशीन, शेतीची विविध प्रकारची जैविक औषधे, विविध बी-बियाणे व फळे,पशु खाद्य, गांडूळ खत साहित्य व मार्गदर्शन, शेती विषयक देश विदेशातील माहिती पुस्तके, विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल अशा प्रकारे प्रत्येक स्टॉलवर शेतकरी माहिती घेवून खरेदी करीत असल्यामुळे पहिल्याच दिवशी कर्मवीर कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून उर्वरित रविवार व सोमवार या दिवशी मोठी गर्दी होणार आहे.



