ब्रेकिंग

आ. आशुतोष काळेंची शिष्टाई फळाला; जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूरला मिळणार निळवंडेचे पाणी

आ. आशुतोष काळेंची शिष्टाई फळाला; जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूरला मिळणार निळवंडेचे पाणी

आ. आशुतोष काळेंची शिष्टाई फळाला; जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूरला मिळणार निळवंडेचे पाणी

कोपरगांव । प्रतिनिधी । निळवंडे कालव्याचे पाणी जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूर येथील बंधारे आणि पाझर तलावांपर्यंत पोहोचविण्याच्या मार्गातील अडचणी दूर करण्यात आमदार आशुतोष काळे यांना यश आले आहे. वितरिका क्रमांक ४ अर्थात मंगलमूर्ती लॉन्स येथे बसविण्यात आलेल्या व्हॉल्व्हच्या पाईपलाईनचे रखडलेले काम शेतकऱ्याची समजूत काढून मार्गी लावल्यामुळे चारही गावांना निळवंडेचे पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे चारही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

निळवंडे कालव्यातून जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूर येथील बंधारे आणि पाझर तलाव भरता यावेत, यासाठी मंगलमूर्ती लॉन्स येथे व्हॉल्व्ह बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार वितरिका क्रमांक ४ वर मंगलमूर्ती लॉन्स येथे व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण झाले; मात्र त्यासाठी आवश्यक पाईपलाईन एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून टाकणे बाकी असल्याने पाणी पुढे नेण्याचे काम रखडले होते.निळवंडे कालव्याला आवर्तन सुरू झाल्यानंतर पाच दिवसांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी लाभक्षेत्रातील गावांचा दौरा करून पाणी वितरणाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी रांजणगाव देशमुख येथील डाळिंबाच्या बागेतून पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेतली. शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेत त्याची समजूत काढली आणि उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्याचे समाधान होईल असा मार्ग काढला. संबंधित शेतकऱ्यानेही मनाचा मोठेपणा दाखवत डाळिंबाच्या बागेतून पाईपलाईन टाकण्यास संमती दिली.त्यानंतर रविवार (दि.२२) रोजी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वितरिका क्रमांक ४ चे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून दोनच दिवसात हे काम पूर्ण होऊन उजनी टप्पा क्र.०१च्या लाभक्षेत्रातील जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूर येथील बंधारे आणि पाझर तलाव निळवंडे कालव्याच्या पाण्याने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांची अडचण समजून घेत केलेल्या मध्यस्थीमुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने चारही गावांत समाधान व्यक्त होत आहे.

पाण्यासाठी भर उन्हात कालव्याच्या मातीच्या भरावावर बसणारा आमदार—-

पावसाळ्यातील काही अपवादात्मक महिने वगळता टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या जिरायती भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाण्याच्या वेदना आमदार आशुतोष काळे यांनी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे निळवंडे कालव्याच्या चाचण्या सुरू झाल्यापासून कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी ध्यास घेतला. जिथे चर खोदून पाणी नेता येईल तिथे चर खोदले, त्यासाठी स्वतःची यंत्रणा कामाला लावली; जिथे चर शक्य नव्हते तिथे डोंगळे टाकून पाण्याचा मार्ग निर्माण केला. पाणी गावागावात पोहोचावे यासाठी त्यांनी प्रत्येक अडचणीवर मार्ग शोधला. हे काम सुरू असताना भर उन्हात कालव्याच्या मातीच्या भरावावर मांडी घालून, काम पूर्ण होईपर्यंत ठाण मांडून बसलेले आमदार आशुतोष काळे जिरायती भागातील ग्रामस्थांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. तहानलेल्या गावांना पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाण्याऐवजी त्यांच्या शिवारात पाणी दिसावे, यासाठी पदाचा नव्हे तर माणुसकीचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या या नेतृत्वाची जिद्द आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी मनापासून धडपडणारा आणि अडचणीसमोर हार न मानणारा लोकप्रतिनिधी असेल, तरच विकासाची कामे प्रत्यक्षात उतरतात, याची प्रचिती वितरिका क्रमांक ४ च्या सुरू झालेल्या कामातून आली आहे.-गजानन मते (सरपंच-रांजणगाव देशमुख)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!