ब्रेकिंग

शेती आपली तर बदल आपल्यालाच करावा लागेल; सूक्ष्म जीव हेच शेतीची नाडी आहे- डॉ. हरिहर कौसाडीकर

शेती आपली तर बदल आपल्यालाच करावा लागेल; सूक्ष्म जीव हेच शेतीची नाडी आहे- डॉ. हरिहर कौसाडीकर

कर्मवीर कर्मवीर कृषी महोत्सव-२०२६ मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोपरगांव । प्रतिनिधी ।  रासायनिक खतांचा अमर्याद वापर केल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला असून उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव हीच खरी शेतीची नाडी असून सेंद्रिय खतांच्या नियमित वापरातून जमिन सुधारण्यास मोठी मदत होते. जमीन आपली तर बदलही आपल्यालाच करावा लागेल असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक विद्यापीठाचे मृदा विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसाडीकर यांनी केले आहे.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत रविवार (दि.२२) रोजी शेतकऱ्यांसाठी क्षारपड जमीन सुधारणा व उत्पादन वाढ या विषयावर डॉ. हरिहर कौसाडीकर यांच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

पुढे बोलतांना त्यांनी सांगितले कि, अलिकडच्या काळात एकावेळी एक पिके घेतले जात असल्याने पिकांवर रोग, कीड आणि बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी मोठ्या सरीचा वापर करावा जेणे करून ऊस लहान आहे, तोवर अंतर्गत पिके घेता येतील. या अंतर्गत पिकांचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. ऊस लहान आहे तोवर अंतर्गत पिके निघतात आणि दुसरा फायदा असा कि अंतर्गत पिकाचे उरलेले अवशेष, पाने, खोड आणि मुळ्या या ऊसासाठी वरदान ठरतात. ऊस तोडणी झाल्यावर पाचट पेटवून न देता, पाचट मशिनच्या सहाय्याने बारीक करून त्याचे ऊसाला आच्छादन तयार करावे. जमिनीला आच्छादन असल्यास बदलत्या हवामानाचा जमिनीवर परिणाम अतिशय कमी होतो. जमिनीतील सूक्ष्मजीव सुरक्षित राहून पाचट जस जसे कुजते तस तसे सूक्ष्मजीव वाढीस मदत होते. जमिनीत सूक्ष्म जीवांची संख्या जेवढी जास्त तेवढा उत्पादन खर्च कमी होतो. सूक्ष्म जीवांची संख्या वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट, हिरवळीची खते तसेच जिवाणू संवर्धके यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर करावा. जमिनीतील सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पिकांसाठी अन्नद्रव्ये सहज उपलब्ध करून देतात. तसेच मुळांची वाढ सक्षम करणे, जमिनीची जलधारणा क्षमता वाढवणे आणि पिकांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे यामध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे जमिनीला केवळ रासायनिक खतांचा आधार न देता ती जिवंत ठेवण्यासाठी सूक्ष्मजीवांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.माती हि जिवंत असल्याने शेतकऱ्यांनी मातीवर प्रेम करावे. जमिनीला पाणी, खत आणि औषधे मोजून- मापून द्यावी. याने जमिनीचे आयुष्य आणि शेतकऱ्यांचे भविष्य सुधारण्यास मदत होते. वेळोवेळी माती आणि पाण्याची चाचणी करून त्यानुसार जमिनीत शेंद्रीय खतांचा आणि जैविक घटकांचा वापर करून मातीला सक्षम आणि समृद्ध बनवावे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऊसाचे जास्त टनेज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करतात. हि अतिशय कौतुकाची बाब असून सेंद्रिय आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सत्काराचा मानकरी व्हावे असे आवाहन डॉ. हरिहर कौसाडीकर यांनी केले.

या चर्चा सत्रासाठी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिनार कुदळे, कारखान्याचे संचालक सुनील मांजरे, शंकरराव चव्हाण, श्रीराम राजेभोसले, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मवीर कृषी महोत्सव २०२६ च्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार अशोकराव काळे यांनी महोत्सवातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवनवीन कृषी उपकरणे, खते व सुधारित बियाणे यांची माहिती जाणून घेतली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!