संगमनेर । प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या समस्यांबाबत महावितरणाने तात्काळ उपाययोजना करून ह्या प्रश्नाबाबत तातडीने मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या वतीने वीज महामंडळाला हे निवेदन देण्यात आले असून यावेळी अरुण गुंजाळ, नामदेव शिंदे, वीरधवल साबळे, दीपक शिंदे, सुहास आहेर, प्रीतम साबळे, सुनील काळे, विजय राहणे, भाऊराव रहाणे, ताराचंद शिंदे,विलास मोरे आदींसह शेतकरी संख्येने उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की, रोटेशन कालावधीमध्ये यापूर्वी प्रवरा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना अखंडित व सुरळीतपणे पूर्ण दाबावे 11 तास वीज पुरवठा करण्यात येत होता, मात्र मागील तीन महिन्यांपासून तो विज पुरवठा सुरळीत होत नाही. अवघी चार तास लाईट मिळते. शिवाय ती अत्यंत कमी दाबाने असते. ही वीज व्यवस्था सुरळीत होऊन पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला पाहिजे.जाहिरात
संगमनेर तालुक्यातील विविध सबस्टेशन अंतर्गत असलेल्या ॲग्री व गावठाण फिडरवर फक्त चार तास विद्युत पुरवठा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पिके जळून चालली आहे, तरी महावितरण सर्व फिडरवर तात्काळ पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ आठ तास विद्युत पुरवठा केला पाहिजे. तसेच नादुरुस्त रोहित तात्काळ बदलून मिळावे अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आले आहे.तरी वरील सर्व प्रश्नांबाबत महावितरणाने तात्काळ उपायोजना कराव्यात अन्यथा महावितरण कार्यालयावर पुढील 8 दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची महावितरणने दक्षता घ्यावी. आंदोलनाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ती सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील असा इशाराही सर्व शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.