विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ बनवण्यासाठी होगनसची विखे पॉलिटेक्निकला बहुमोल भेट !
होगनस कंपनीतर्फे विखे पॉलिटेक्निकल येथे इंडस्ट्रियल सेफ्टी लॅबची उभारणी
विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ बनवण्यासाठी होगनसची विखे पॉलिटेक्निकला बहुमोल भेट !

होगनस कंपनीतर्फे विखे पॉलिटेक्निकल येथे इंडस्ट्रियल सेफ्टी लॅबची उभारणी
लोणी । प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी, अहिल्यानगर येथील नामांकित ‘होगनस इंडिया प्रा.लि.’ या कंपनीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकला एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. कंपनीने आपल्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) तब्बल तीन लाख रुपये खर्चून अद्ययावत ‘इंडस्ट्रियल सेफ्टी लॅब’ची उभारणी केली आहे. यासोबतच महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी दोन सॅनिटरी व्हेंडिंग मशीनही भेट देण्यात आल्या असल्याची माहीती प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली.

याप्रसंगी होगनस इंडिया प्रा. लि. चे प्लान्ट हेड डॉ. शरद मगर यांच्यासह पर्यावरण सुरक्षा व्यवस्थापक अमोल विरकर, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. विजय राठी, मेकॅट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. राजेंद निंबाळकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.या लॅबमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणातील सुरक्षिततेचे धडे मिळणार आहेत. होगनस इंडियाचे प्लान्ट हेड डॉ. शरद मगर यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षेच्या माहितीअभावी अडचणी येतात. मात्र, या लॅबमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यानच या गोष्टींची माहिती मिळेल आणि ते ‘इंडस्ट्री रेडी’ बनतील.डॉ. शरद मगर यांनी इंडस्ट्रियल सेफ्टीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, कामाच्या ठिकाणी अपघात किंवा दुखापत टाळण्यासाठी आणि जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे नियम साधे असले तरी त्यांचे महत्त्व मोठे आहे. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची माहिती, उपयुक्त उपकरणांची ओळख आणि त्यांच्या वापराचे ज्ञान सहज आणि सोप्या पद्धतीने आत्मसात करता येईल. मनुष्यबळ व्यवस्थापक अभिषेक कोल्पेक तसेच उपसंचालक जिल्हा उद्योग सुरक्षा अहिल्यानगर के.टी. झोपे यांचे या लॅबच्या उभारणीसाठी मार्गदर्शन लाभले.

या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी होगनस इंडियाच्या व्यवस्थापनाचे आभार मानले आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी केले.हा अभिनव उपक्रम विखे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक तसेच सार्वजनिक जगात यशस्वी होण्यासाठी अधिक सक्षम बनवेल आणि कंपनी-महाविद्यालय यांच्यातील संबंध अधिक दृढ करेल.



