गोदा ते नर्मदा जलयात्रेचे साईनगरीत रविवारी होणार मंगलमय आगमन!
राज्यातील ३०नद्यांच्या पाण्याचे होणार पूजन,भव्य सांस्कृतिक सोहळा

गोदा ते नर्मदा जलयात्रेचे साईनगरीत रविवारी होणार मंगलमय आगमन!


राज्यातील ३०नद्यांच्या पाण्याचे होणार पूजन,भव्य सांस्कृतिक सोहळा
शिर्डी । प्रतिनिधी । नर्मदेचा विलोभनीय किनारा आणि गोदावरीचा पवित्र तीर यांना भक्तीच्या धाग्याने जोडणारी गोदा ते नमर्दा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा सबका मालिक एक असा संदेश देणार्या साईबाबांच्या भूमीत येत असून राज्यातील ३० प्रमुख नद्यांचे जल कलशांचे पूजन आणि भव्य असा सांस्कृतिक सोहळा जलयात्रेच्या स्वागताचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या’च्या निमित्ताने, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विभागाने ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रे’चे आयोजन २५ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान केले आहे. श्रीक्षेत्र चौंडी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र महेश्वर (मध्य प्रदेश) असा सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास या यात्रेचा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून यात्रेचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश दिला जात आहे.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून मार्गस्थ होणाऱ्या दोन्ही यात्रा शिर्डीमध्ये २५ एप्रिल २०२६ रोजी येणार आहेत. तसेच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राज्यातील ३० प्रमुख नद्यांचे जलकलश शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व जलकलशांचे सामूहिक पूजन वारकरी तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील महंतांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जल व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच जलसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये लोक सहभागातून अधिकचे काम कसे करता येईल, हा उद्देश यात्रेच्या नियोजनामागे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची संकल्पना जलसंपदा विभाग क्रांतिकारी निर्णय घेऊन कृतीमध्ये उतरवत आहे. या सर्व निर्णयांना लोकांचेही पाठबळ मिळावे, जलसाक्षरतेच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व अधिक विशद व्हावे, असे प्रबोधनात्मक कार्यक्रम या यात्रेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहेत. ‘वारसा, विचार आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित यात्रेचे नियोजन असून, अहिल्यादेवी होळकरांनी कला क्षेत्रालाही मोठे प्राधान्य दिले होते. त्यामुळेच शिर्डी येथे भव्यदिव्य असा सांस्कृतिक सोहळा यात्रेच्या स्वागतासाठी क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिर्डीकर नागरिकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र चोंडी येथून येणारी जलयात्रा अहील्यानगर नेवासा श्रीरामपूर पुणतांबा मार्गे शिर्डीत दाखल होईल.त्र्यंबकेश्वर पासून निघालेली जलयात्रा संगमनेर जोर्वे उंबरी आश्वी लोणी कोल्हार राहाता मार्गे शिर्डीत पोहचेल ठिकठिकाणी ग्रामस्थ कार्यकर्ते यात्रेच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे.



