नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये कोणी अडकले असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा – मंत्री विखे पाटील

नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये कोणी अडकले असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा – मंत्री विखे पाटील


जिल्ह्यातून पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करून उपाययोजना करण्याच्या सूचना
अहिल्यानगर । प्रतिनिधी । नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातून पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करून उपाययोजना करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.अहिल्यानगर जिल्ह्यातून नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या संदर्भात मंत्री विखे-पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून माहिती घेतली. खाजगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पर्यटक नेपाळ आणि अन्य भागांत गेले आहेत. या सर्वांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्व पर्यटकांचा पुढचा प्रवास सुखरूप सुरू झाला असल्याचे मंत्री विखे-पाटील म्हणाले.नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाल्याने राज्यातील पर्यटकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पर्यटकांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंत्रालयात कक्ष स्थापन केला आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या संदर्भात माहिती नोंदविण्यासाठी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ ही लिंक देण्यात आली असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष निर्माण केला असून, ०२४१-२३२३८४४ आणि २३५६९४० या क्रमांकांसह १०७७ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले आहेत, नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये कोणी अडकले असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.



