ब्रेकिंग
दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने दुधाला दहा रुपये अनुदान सुरु करावे – परजणे

दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने
दुधाला दहा रुपये अनुदान सुरु करावे – परजणे

दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने दुधाला दहा रुपये अनुदान सुरु करावे – परजणे
कोपरगांव । प्रतिनिधी । दुग्ध व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्वच वस्तुंच्या दरात सद्या मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून पावसानेही ओढ दिल्याने सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भविष्यात दुग्ध व्यवसाय बंद पडण्याची भीती निर्माण झाल्याने शासन पातळीवरुन या गंभिर बाबींची दखल घेण्यात येवून दिवाळी सणापर्यंत दुधाला प्रती लिटर किमान १० रुपये अनुदान सुरु करावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, श्रीमती सुनेत्राताई पवार, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, पशुसंवर्धनमंत्री पंकजाताई मुंडे, राज्याचे दुग्ध विभागाचे सचिव यांना श्री परजणे यांनी पत्र पाठवून दुग्ध व्यवसायाची सद्याची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. पत्रात त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र शासनाकडून यापूर्वी दुधाला ७ रुपये अनुदान देण्याची योजना सुरु होती. या योजनेमुळे दूध उत्पाकांच्या हातात दोन पैसे पडत होते. काही प्रमाणात अडचणी देखील सुटत होत्या. परंतु ती योजना नोव्हेंबर २०२४ नंतर बंद झालेली आहे. परिणामी दुधावर प्रक्रिया करणारे राज्यातील सहकारी दूध संघ, छोट्या मोठ्या दूध संस्था व दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सद्या वीज, डिझेल, पेट्रोलसह पॉलिथीन, कोरोगेटेड बॉक्स व दूध प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमती मोठ्या प्रमाणांवर वाढलेल्या आहेत. खरेदी आणि विक्रीचा ताळमेळ बसत नसल्याने दूध संघांना तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. पशुखाद्य, हिरवा व कोरडा चारा यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. बाजारपेठेत ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दूध संघांकडून त्यांच्या दुधाला समाधानकारक दर दिला जात असल्याने संघांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यातच पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांसाठी लागणारी चारा पिके पावसाअभावी कमी झाली आहेत. परिणामी हिरव्या चाऱ्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. दुभत्या जनावरांचे पालन पोषण करणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे. हा सगळा विचार करता अनुदानाशिवाय दुग्ध व्यवसाय करणे संघांना व शेतकऱ्यांना शक्य नसल्याने शासनाने दुधाला अनुदान सुरु करणे गरजेचे आहे. सद्याची नैसर्गिक असमतोल परिस्थिती आणि महागाई यामुळे दुग्ध व्यवसाय सद्या खुपच अडचणीत सापडला आहे. या व्यवसायासाठी शासनाकडून आवश्यक ती धोरणे राबविली जात नसल्याने अनेक चढ उताराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही भयावह परिस्थिती विचारात घेऊन येणाऱ्या दिवाळी सणापर्यंत शासनाने दुधाला प्रती लिटर १० रुपयाचे अनुदान सुरु करुन अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करुन त्यांना आधार द्यावा अशीही मागणी परजणे पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.



