जयहिंद लोकचळवळीच्या वतीने रविवार व सोमवारी बालकला महोत्सव

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने रविवार व सोमवारी बालकला महोत्सव

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

संगमनेर । प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रात्यक्षिकासह मातीकाम, पेंटिंग, ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण, वॉटर कलर, संगीत, झुम्बा डान्स यांसह विविध उपक्रमांनी सजलेल्या दोन दिवसीय बालकला महोत्सवाचे रविवार दिनांक 6 सप्टेंबर व सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवक व विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यावर्षीही रविवार 6 सप्टेंबर व सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे रंगभरण स्पर्धा, मातीकाम ,कागदी फुले तयार करणे, थ्रीडी पेंटिंग ,प्रशिक्षण वर्ग, डूडल आर्ट, कॅलिग्राफी ,बाहुली काम ,म्युझियम, झुम्बा डान्स स्टील ऑन विल प्रशिक्षण असे विविध उपक्रम असलेल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी 9 वा काँग्रेस नेते माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या तालुकास्तरीय बालकला महोत्सवातील रंगभरण स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली व दुसरी मधील विद्यार्थ्यांसाठी एक ते पाच क्रमांकापर्यंत उत्तेजनार्थ 500 रुपयांचे बक्षीस तिसरी व चौथी मधील विद्यार्थ्यांकरता 300 रुपये बक्षीस पाचवी ते सहावी एक ते पाच क्रमांकासाठी उत्तेजनार्थ 250 रुपये बक्षीस सातवी ते आठवी एक ते पाच क्रमांक उत्तेजनार्थ साठी दोनशे रुपये बक्षीस आणि नववी ते दहावी एक ते पाच क्रमांकासाठी 150 रुपये बक्षीस दिले जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मोफत आहे.तरी या रंगभरण स्पर्धा व बाल महोत्सवांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकाश पारखे, चांगदेव खेमनर ,सुनील कवडे ,संजय मासाळ ,राजू गोरे ,संजय सोनवणे, मिनीनाथ जोर्वेकर, दत्ता बटवाल विकास भालेराव यांच्यासह जयहिंद लोकचळवळीच्या वतीने व संगमनेर तालुका कला शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



