ब्रेकिंग

नाशिक-पुणे रेल्वेच्या निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा?

नाशिक-पुणे रेल्वेच्या निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा?

६० दिवसांची मुदत उलटूनही समितीचा अभ्यास सुरूच

संगमनेर । प्रतिनिधी । नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. या प्रकल्पाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत उलटून गेल्यानंतरही समितीचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. असे असले तरी समितीच्या आतापर्यंत झालेल्या दोन बैठका, नियमित चर्चेची प्रक्रिया आणि तज्ज्ञ संस्थांकडून तांत्रिक सल्ला घेण्याच्या विचारामुळे या प्रक्रियेला आणखी काही काळ देण्याची तयारी आमदार सत्यजीत तांबे यांनी दर्शवली आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जनसुनावणी झालीच पाहिजे, या मागणीवर ते ठाम आहेत.नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. समितीला ६० दिवसांपेक्षा अधिक मुदतवाढ देऊ नये आणि दुसरी म्हणजे प्रकल्पाशी संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जनसुनावणी आयोजित करावी. या दोन मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या समितीच्या कामकाजाकडे लक्ष दिले जात आहे.

समितीच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे आणखी प्रतीक्षा करण्याची तयारी

६० दिवसांची मुदत ओलांडली असली तरी समितीच्या कामकाजाबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत समितीच्या दोन बैठका झाल्या असून, साधारणतः दर आठ ते पंधरा दिवसांनी समितीची बैठक होत आहे. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा तांत्रिकदृष्ट्या सखोल अभ्यास करण्यासाठी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांसारख्या नामांकित संस्थांकडून तज्ज्ञ सल्ला घेण्याचाही समिती विचार करीत आहे. ही बाब सकारात्मक असून, समिती या प्रश्नाकडे गांभीर्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असेल, तर आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याची आपली तयारी असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे.समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर रोजी बैठक झाली असून, पुढील बैठकही आठ दिवसांच्या कालावधीत घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे समितीच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळून प्रकल्पाबाबत ठोस निष्कर्ष समोर येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दुसरीकडे, आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या जनसुनावणीच्या मागणीबाबत अद्याप ठोस हालचाल दिसून आलेली नाही. डॉ. अनिल काकोडकर समितीतील सदस्य असलेले पुणे आणि नाशिकचे विभागीय आयुक्त यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.या प्रकल्पामुळे ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, अशा बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, रेल्वे प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांशी संवाद साधणे तसेच या प्रकल्पाबाबत विविध भागांतील नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, या दृष्टीने अद्याप प्रत्यक्ष पातळीवर अपेक्षित हालचाल झालेली नाही.येत्या काळात जनसुनावणी आयोजित करून बाधित शेतकरी, नागरिक आणि प्रकल्पाचे समर्थक अशा सर्व घटकांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जावी, यासाठी आमदार सत्यजीत तांबे पुढाकार घेणार आहेत. समितीच्या अध्यक्षांसह संबंधित सदस्यांपर्यंत ही मागणी पुन्हा मांडून जनसुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ते पाठपुरावा करत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!