ब्रेकिंग

संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान! गोव्यात आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार प्रदान

संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान! गोव्यात आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार प्रदान

‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव 
संगमनेर । प्रतिनिधी ।  अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर या स्वायत्त महाविद्यालयाने शैक्षणिक, नवोपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्ली यांच्या वतीने महाविद्याराला घोषित करण्यात आलेले ‘आयएसटीई उत्कृष्ट हरित परिसर पुरस्कार (बेस्ट ग्रीन कॅम्पस अवॉर्ड)’ आणि ‘आयएसटीई उत्कृष्ट नवोपक्रम आणि स्टार्टअप परिसंस्था पुरस्कार (बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम अवॉर्ड)’ हे दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी गोवा येथील ‘हॉटेल रोनिल जेडी हयात’ येथे आयोजित दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात अधिकृतपणे प्रदान करण्यात आले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी रोवलेल्या शैक्षणिक बीजाचा आज एका समृद्ध वटवृक्षामध्ये विस्तार झाला आहे. आयएसटीईच्या माध्यमातून मिळालेले हे दोन राष्ट्रीय बहुमान हा संपूर्ण अमृतवाहिनी कुटुंबासाठी अत्यंत गर्वाची अन् अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्यामध्ये नवसंशोधन, उद्योजकीय दृष्टी आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अविरत कष्टांचे हे फळ आहे.
– शरयू देशमुख,व्यवस्थापकीय विश्वस्त
विशेष म्हणजे, आयएसटीई कडून महाविद्यालयास यापूर्वी म्हणजेच मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुद्धा ‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज अवॉर्ड’ मिळालेला होता. सलग दोन्ही शैक्षणिक वर्षात आयएसटीईचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ‘अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय’ हे संपूर्ण महाराष्ट्र व गोवा विभागातून एकमेव महाविद्यालय ठरले आहे.गोव्यातील संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पारितोषिक वितरण सोहळ्यास तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. यामध्ये टेक्नो इंडिया विद्यापीठ (पश्चिम बंगाल) चे कुलगुरू प्रा. (डॉ.) सैकत मैत्रा, आयएसटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, आयएसटीई महाराष्ट्र-गोवा विभागाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) रणजित सावंत, आयएसटीई महाराष्ट्र-गोवा विभागाचे सचिव प्रा. के. पी. कुंभार आणि आयएसटीई नवी दिल्लीचे कार्यकारी सचिव डॉ. एस. एम. अली यांचा समावेश होता.

सदर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व सचिव मा. शरयूताई देशमुख, विश्वस्त अनिल शिंदे आणि मॅनेजर व्ही. बी. धुमाळ यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, ग्रीन कॅम्पस प्रस्तावाचे समन्वयक डॉ. एस. बी. कांडेकर आणि इन्क्युबेशन सेंटरचे प्रमुख डॉ. डी. एस. बजाज, आयएसटीई समन्वयक डॉ. एम. ए. वाकचौरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.नॅककडून ‘A+’ श्रेणी प्राप्त, ५ वेळा एन.बी.ए. मान्यताप्राप्त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायमस्वरूपी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाच्या दुहेरी राष्ट्रीय बहुमानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त मा. शरयूताई देशमुख, प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून अमृतवाहिनी महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!