अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी आत्मा -विखे पाटील

अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी आत्मा -विखे पाटील


अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी आत्मा -विखे पाटील
शिर्डी । प्रतिनिधी । अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी आत्मा आहे. पक्षाचा विचार घेऊनच समाजातील सर्व क्षेत्रांत कार्यकर्ता म्हणून काम करताना पक्ष संघटना हेच आपल्या सर्वांसाठी बळ आहे. देशाच्या विकास प्रक्रियेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्योदयाच्या मंत्राची जोड दिली असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. आ. मोनिका राजळे, आ. अक्षय कर्डिले, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, प्रदेश पदाधिकारी रवीजी अनासपुरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते यांच्यासह जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिरातील दोन दिवसांच्या कार्यक्रमात एकूण अकरा सत्रे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, माजी आमदार राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, लक्ष्मण सावजी, सचिव भैरवी वाघ, अजित चव्हाण तसेच लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी मार्गदर्शन केले.

समारोप सत्रामध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या प्रशिक्षण शिबिराला वैचारिक अधिष्ठान होते. प्रशिक्षणाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना दिलेले पुस्तक हे आपल्या सर्वांसाठी गीतेसमान असून, त्यातील विचारांनुसार बूथ स्तरापर्यंत आपल्याला काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिरामुळे आपल्या कार्याला गती मिळणार असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा आणि एकात्म मानवतेचा मंत्र आपल्या सर्वांसाठी आत्मा आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला विकास प्रक्रियेत सामावून घ्यायचे आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल, हे उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येकाची वाटचाल असली पाहिजे.राजकीय व सामाजिक कार्यात आपली वैचारिक भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना आपल्या कृतीत असावी. पक्षाचे संस्कार हाच आपल्या कामाचा पाया असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या सुरू असलेल्या प्रत्येक कामाला विचारांची जोड आहे. म्हणूनच जगात देशाचे स्थान बळकट झाले असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.भारतीय जनता पक्षाचा एक प्रशिक्षित कार्यकर्ता म्हणून समाजातील सर्व क्षेत्रांत आपल्याला काम करायचे आहे. लोकांना पक्षाशी जोडायचे आहे. भाजप हा एक परिवार आहे ही भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना आपली कर्तव्ये बजावावी लागतील. चांगला संवाद, चांगले वर्तन आणि संघटना हे आपले बळ मानून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

याप्रसंगी लक्ष्मण सावजी यांनी पक्षाचा इतिहास आणि वाटचाल अधोरेखित करताना सांगितले की, पक्षाच्या प्रत्येक वाटचालीमध्ये संघर्ष होता. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी कधी हार मानली नाही. उलट समर्पित भावनेने काम होत राहिले. सर्वांच्या त्यागातून विस्तारलेल्या पक्षाच्या कामामध्ये आव्हाने असली तरी विचारांच्या आधारावर आता भाजपाचे यश कोणी रोखू शकणार नाही. यासाठी संघटनात्मक कार्यात कार्यकर्त्यांनी आपली भूमिका नेमकेपणाने बजावावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.



