ब्रेकिंग

दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने दूध उत्पादकांच्या पाठिशी उभे राहावे – परजणे

दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने
दूध उत्पादकांच्या पाठिशी उभे राहावे – परजणे

गोदावरी दूध संघाच्या वार्षिक सभेतील ठरावाद्वारे शासनाकडे मागणी

कोपरगांव । प्रतिनिधी । सद्या दुष्काळाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या परिस्थितीतीचा गांभिर्याने विचार करुन शासनाने दुधाला प्रतिलिटर किमान दहा रुपये अनुदान तातडीने सुरु करुन दूध उत्पादकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केली. सभेत मांडलेल्या या ठरावास सभासदांनी पाठिंबा देऊन तो शासनाकडे पाठविण्याचे सर्वानुमते ठरले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्राताई पवार, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी दुष्काळाचे गांभिर्य विचारात घेऊन कोपरगांव तालुक्यातील गांवतळे, पाझरतलाव भरुन देण्याचा निर्णय घेतल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. राज्यात अन्न भेसळ प्रतिबंधात्मक विभागाच्या आयुक्तपदी श्री तुकाराम मुडे यांनी नियुक्ती झाल्याने व त्यांनी भेसळीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे दुधातील भेसळीचे प्रमाण कमी झालेले आहे. या अभिनंदनीय बाबी असल्याचे सांगून श्री परजणे पुढे म्हणाले, सहकारी तत्वावरील दुग्धव्यवसायासमोर सद्या मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. पशुखद्याचे वाढते दर, जनावरांच्या संगोपनाचा खर्च, हवामानातील सतत होणारे बदल, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृष्य परिस्थिती, दूध उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ उतार यामुळे दूध उत्पादकांवर मोठा आर्थिक ताण आलेला आहे. अशाही परिस्थितीत गोदावरी संघाने दूध उत्पादकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेऊन शासनाचे अनुदान नसतानाही दुधाला प्रतिलिटर ४१ रुपये दर देण्याची भूमिका घेतली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत दूध उत्पादन कमी होत असल्याने उत्पादकांबरोबरच प्रक्रिया करणारे संघ देखील अडचणीत येतात. याबाबींचा विचार करुन शासनाने आर्थिक आधार देण्यासाठी योग्य मदत व प्रोत्साहनपर योजना राबविणे गरजेचे आहे. पशुधन ही शेतकऱ्यांची संपत्ती आहे. अनेक वर्षे संगोपन करून तयार केलेले पशुधन चारा पाण्याअभावी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी चारा पाणी, पशुखाद्यावरील अनुदान, पशुवैद्यकीय सेवा आणि दूध व्यवसायाला आर्थिक संरक्षण याबाबतीत देखील शासन पातळीवरुन प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. राज्यातील साखर उद्योगाला शासनाकडून ज्या सवलती दिल्या जातात तशाच सवलती दुग्धव्यवसायालाही देण्याची भूमिका सरकारने घ्यावी अशी मागणीही श्री परजणे यांनी केली.संकलनापासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी टिकला तर दुग्धव्यवसाय टिकेल आणि दुग्धव्यवसाय टिकला तर सहकार टिकेल या भावनेतून संघाची अधिक सक्षम, पारदर्शक आणि दूध उत्पादककेंद्रीत वाटचाल सुरु आहे. केवळ दुधाचे संकलन आणि विक्री हा संघाचा उद्देश नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या कष्टाचा विश्वासाचा आणि आर्थिक स्वावलंबनाचा आधार हा संघाचा मुख्य हेतू आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला, ग्राहकांना गुणवत्तापूर्ण दूध आणि सहकारी संस्थांना आर्थिक स्थैर्य या त्रिसूत्रीवर आपल्याला भविष्यातली वाटचाल करावी लागणार आहे. सहकाराची ही चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी शासन, सहकारी संस्था आणि दूध उत्पादक शेतकरी या सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही श्री परजणे पाटील यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय संकटातून वाटचाल करीत असतानाही गोदावरी दूध संघाने आधुनिकतेला प्राधान्य देऊन संघ कार्यस्थळावर नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामकाज सुरु केलेले आहे. गुणवत्ता व दर्जा याबाबतीत कोणतीही तडजोड न करता संघाने बाजारपेठेतील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे.

सभेला संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार, संचालक विवेक परजणे, उत्तमराव डांगे, भाऊसाहेब कदम, गोरक्षनाथ शिंदे, नानासाहेब काळवाघे, सुदामराव कोळसे, जगदीप रोहमारे, संजय टुपके, भिकाजी झिंजुर्डे, सौ. सुनंदाताई होन, सौ. सरलाताई चांदर, सौ. सुमनबाई शिंदे, नानासाहेब सिनगर, संजीवनी कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, उत्तमराव माने, अशोकराव दुपके, आंबादास वराडे, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड, लक्ष्मणराव शिंदे, विजय परजणे, अशोकराव काजळे, सुदामराव शिंदे, सीताराम कांडेकर, यशवंतराव गव्हाणे, दत्तात्रय शितोळे, बायफ संस्थेचे डॉ. बाळासाहेब जिगळेकर यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालक विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!