ब्रेकिंग

सोमवार (दि.२८)पासून गौतमच्या मैदानावर रंगणार हॉकीचा राज्यस्तरीय थरार

सोमवार (दि.२८)पासून गौतमच्या मैदानावर रंगणार हॉकीचा राज्यस्तरीय थरार

हॉकीचे मैदान गाजवण्यासाठी राज्यभरातील २७ संघांची उपस्थिती

कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.२८ )पासून राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८, २९ व ३० असे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे गौतमच्या मैदानावर हॉकी प्रेमींना हॉकीचा रोमांचक थरार अनुभवायला मिळणार आहे. संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून गौतम पब्लिक स्कूलचे भव्य क्रीडांगण पुन्हा एकदा राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.स्पर्धेचे उद्घाटन सोमवार (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स (पुणे) युवराज नाईक, क्रीडा मार्गदर्शक उमेश बडवे, उदय पवार, इकबाल खान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या राज्यस्तरीय स्पर्धेत सब-ज्युनिअर तसेच ज्युनिअर मुला-मुलींचे एकूण २७ संघ सहभागी होणार आहेत. राज्याच्या विविध विभागांतून येणाऱ्या या संघांमधील सुमारे ४०० खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक व सहकारी कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सहभागी संघांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था गौतम पब्लिक स्कूलमध्येच करण्यात आली आहे.

या स्पर्धेला विशेष महत्त्व असून, स्पर्धेतील विजयी संघाला दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील उदयोन्मुख हॉकीपटूंसाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.विशेष म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा सब-ज्युनिअर हॉकी संघही या स्पर्धेत सहभागी होत असून घरच्या मैदानावर खेळताना गौतमच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्पर्धेत पुणे,नाशिक, नागपूर,अमरावती, मुंबई, लातूर, क्रीडा प्रबोधिनी पुणे, छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूर आदी विभागांतील संघ सहभागी होणार आहेत.त्यामुळे विविध विभागांतील युवा हॉकीपटूंच्या कौशल्याची चुरस गौतमच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे.गौतम पब्लिक स्कूलमध्ये यापूर्वीही अनेक वेळा राज्यस्तरीय हॉकी स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. यंदाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठीही शाळेची यंत्रणा सज्ज झाली असून, मैदान, निवास, भोजन तसेच इतर आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली असून प्राचार्य नूर शेख यांनी स्पर्धेच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, फिजिकल डायरेक्टर रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, महेश गोंडे तसेच सर्व हाऊस मास्टर व शिक्षक स्पर्धेच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व संघांचे निवास, भोजन आदी व्यवस्थेबाबत योग्य नियोजन व आदरातिथ्य करण्यासाठी संस्थेच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार अशोकरावजी काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, इन्स्पेक्टर नारायणराव बारे, संस्थेचे सर्व सदस्य तसेच पालक यांनी सहभागी सर्व संघांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!