खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करावे – आ.आशुतोष काळे

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करावे – आ.आशुतोष काळे


खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करावे – आ.आशुतोष काळे
कोपरगांव । प्रतिनिधी । लहरी मान्सूनचा फटका याहीवर्षी खरीप हंगामाला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वेळेवर न पडणारा पाऊस व शेतमालाला मिळत असणारा अनिश्चित दर यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. तरी देखील या अडचणींचा विचार न करता शेतकरी मोठ्या हिम्मतीने आणि विश्वासाने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला आहे. महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रशासनाने देखील आपली जबाबदारी ओळखून खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी कमी कशा करता येतील याचा प्राधान्याने विचार करावा. शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी व अडचणी आल्यास त्या अडचणी तात्काळ सोडवून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी, महसूल, पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.२७) रोजी कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याबाबत व त्यावर करावयाच्या उपाययोजना बाबत त्यांनी कृषी विभागाला मार्गदर्शन केले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा परदेशातून आयात केला जात असल्यामुळे जागतिक युद्धजन्य परिस्थिती पाहता खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचा फटका खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसणार नाही यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. तालुक्याला खतांचा जास्तीत जास्त कोटा कसा मिळेल आणि त्याचा पुरेसा साठा कसा करता येईल यावर भर द्यावा. तसेच खत आणि बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दिवसेंदिवस वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम शेती व्यवसायावर होत असून परीणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी पाट पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणी आणि कापणीच्या संदर्भात अधिकृत माहिती पुरवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जेव्हा नैसर्गिक संकट येते त्यावेळी महसूल आणि कृषी सहाय्यक यांचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र अनेकदा काही लोक राजकीय हेतूने पात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्याचा प्रयत्न करतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा कोणत्याही दबावाखाली न येता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. पीक विम्याच्या बाबत सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम केल्यास शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळणे शक्य होईल यामुळे सर्व विभागांनी एकत्रित काम करून शेतकऱ्यांचे हित जोपासणे गरजेचे असून सामुहिक प्रयत्नातून खरीप हंगाम यशस्वी करावा सूचना आ. आशुतोष काळे यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहे.या बैठकीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी संदिप दळवी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महाबीजचे कृषी क्षेत्र अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी, कृषी सेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



