आज ठरणार जिल्हा बँकेचा कारभारी! सुजय विखेंच्या नावाची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
विखे-थोरातांच्या समन्वयाची आज खरी कसोटी!

आज ठरणार जिल्हा बँकेचा कारभारी! सुजय विखेंच्या नावाची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

विखे-थोरातांच्या समन्वयाची आज खरी कसोटी!
अहिल्यानगर । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा सस्पेन्स आज (गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर) संपणार आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडीकडे लागले असून, बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने होणार असल्याचे सांगितले जात असल्याने ऐनवेळी कोणते नाव पुढे येते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास आघाडीने १७ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर अकोले तालुक्यातील अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने आघाडीचे संख्याबळ १८ वर पोहोचले. दुसरीकडे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाकडे दोन, तर खासदार नीलेश लंके यांच्या परिवर्तन मंडळाकडे एक संचालक आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत सहकार विकास आघाडीचे संख्याबळ महत्त्वाचे ठरणार आहे.
सुजय विखे यांच्या नावाची चर्चा; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
अध्यक्षपदासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध नेत्यांमध्ये समन्वय साधण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याची चर्चा आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, स्वतः सुजय विखे यांनीही अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीने होईल, अशी भूमिका मांडली आहे.
उपाध्यक्षपद दक्षिणेकडे जाणार की उत्तरेकडेच?
अध्यक्षपदासाठी विखे गटाला संधी मिळाल्यास उपाध्यक्षपद कोणाकडे जाणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे. अध्यक्षपद उत्तर अहिल्यानगरकडे गेल्यास उपाध्यक्षपद दक्षिणेकडे देऊन जिल्ह्यातील राजकीय आणि भौगोलिक समतोल साधला जाणार का, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.
विखे-थोरात समन्वयाची खरी परीक्षा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे आणि थोरात या दोन वेगवेगळ्या राजकीय प्रवाहातील नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून एकत्र येत सहकार विकास आघाडीची बांधणी केली. या आघाडीला मिळालेले यश आता पदाधिकारी निवडीच्या टप्प्यावर कोणत्या स्वरूपात दिसणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची, यामध्ये दोन्ही नेत्यांमधील समन्वयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची चौंडी येथे घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चांना उधाण आले होते.
आज सकाळी ११ वाजता विशेष बैठक
जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. आघाडीकडे १८ संचालकांचे पाठबळ असल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध होणार की मतदानाची वेळ येणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, दुसरीकडे विखे-थोरात यांच्यातील समन्वय आणि तिसरीकडे उपाध्यक्षपदाचे राजकीय गणित अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेच्या नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते आणि उपाध्यक्षपदाचा मान कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



