ब्रेकिंग

दिवाळी संपली… गाव पुन्हा शांत झाले; पोटासाठी लेकरांची शहराकडे धाव!

घरातून निघताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, मनात गावच्या आठवणी!

दिवाळी संपली… गाव पुन्हा शांत झाले; पोटासाठी लेकरांची शहराकडे धाव!

घरातून निघताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, मनात गावच्या आठवणी!

अहिल्यानगर । विनोद जवरे । दिवाळीचा सण आला की नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक यांसह राज्यातील विविध शहरांमध्ये स्थायिक झालेली हजारो कुटुंबे आपल्या मायभूमीकडे धाव घेतात. वर्षभर कामाच्या व्यापात अडकलेल्या माणसांना दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावाची, घराची, आई-वडिलांची, नातेवाइकांची आणि मित्रपरिवाराची भेट घेण्याची संधी मिळते. काही दिवसांसाठी का होईना, पण गावच्या मातीत पाय ठेवला की शहरातील धावपळ, ताणतणाव आणि कामाचा व्याप सारे काही विसरायला होते.

मामाचं घर सोडताना भाच्यांचीही पावलं जड!

दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या भाच्यांचा आनंद काही औरच असतो. मामाकडचा लाड, मामीच्या हातचे गोडधोड पदार्थ, मावस भावंडांसोबतची धमाल आणि दिवसभराची मजामस्ती… या सगळ्या आठवणी मनात साठवून आता भाचेही पुन्हा आपल्या घरी परतू लागले आहेत. मामाच्या घरातून निघताना पुन्हा कधी येणार, असा प्रश्न विचारणारे चिमुकले आणि त्यांना निरोप देताना हळवे होणारे मामा-मामी… दिवाळीनंतर अनेक घरांमध्ये असेच भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.
मामाचं घर म्हणजे भाच्यांसाठी हक्काचं दुसरं घर… तिथला पाहुणचार आणि प्रेम मात्र कायम आठवणीत राहणार!

मात्र दिवाळीचे चार दिवस कसे निघून जातात, हे समजतही नाही. घरातील फराळ, अंगणातील पणत्या, नातेवाइकांच्या भेटीगाठी, मित्रांसोबतच्या गप्पा आणि गावातील आनंदाचे क्षण मनात साठवून पुन्हा परतीच्या प्रवासाची वेळ येते. मायभूमीत आल्यानंतर घराबाहेर पडण्याची इच्छा होत नाही; पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्याच्या जबाबदाऱ्यांसाठी पुन्हा कामावर परतणे भाग असते.कालपासून अनेक चाकरमानी आपल्या गावातून पुन्हा मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर शहरांच्या दिशेने रवाना झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुणे-नाशिक महामार्गासह विविध प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर वाढलेली वाहतूक, बसस्थानकांवरील गर्दी आणि खासगी वाहनांचा लांबच लांब प्रवास पाहता दिवाळीनिमित्त गावाकडे आलेली माणसे आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

घरातून निघताना पाय जड होतात…

खरी हुरहूर असते ती घरातून निघताना! आई-वडिलांच्या पाया पडताना, घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेताना आणि लहान मुलांना निरोप देताना अनेकांचे डोळे नकळत पाणावतात. ‘लवकर या’, ‘स्वतःची काळजी घ्या’, ‘वेळेवर जेवण करा’, असे घरच्यांचे शब्द कानात घुमत राहतात. गाडी गावाबाहेर पडते, गाव मागे राहते; पण मन मात्र घराच्या अंगणातच रेंगाळत असते.शहरात पुन्हा काम सुरू होते, रोजची धावपळ सुरू होते, ऑफिसची वेळ, व्यवसायाचा व्याप आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पुन्हा खांद्यावर येतात. मात्र मोबाईलमध्ये जपलेले दिवाळीचे फोटो आणि गावच्या आठवणी मनाला पुन्हा पुन्हा आपल्या माणसांकडे घेऊन जातात.

गावची ओढ कधीच संपत नाही!

शहरात कितीही मोठे घर असले, कितीही चांगली नोकरी किंवा व्यवसाय असला, तरी आपल्या गावातील घराची सर कशालाच येत नाही. कारण गाव म्हणजे केवळ राहण्याचे ठिकाण नसते, तर तिथे बालपण असते, आठवणी असतात, नाती असतात आणि आपल्या अस्तित्वाची मुळे असतात.दिवाळी संपली, चाकरमानी परतले, गावातील गजबज हळूहळू कमी झाली. पुन्हा एकदा गावच्या घरांना पुढच्या सणाची, पुढच्या सुट्टीची आणि आपल्या लेकरांच्या परतीची प्रतीक्षा लागली आहे. शरीराने माणसं शहरात पोहोचली असली, तरी त्यांचं मन मात्र अजूनही आपल्या मायभूमीच्या अंगणातच आहे!

आजोबा-नातवंडांच्या भेटीत दिवाळीचा आनंद द्विगुणित!

दिवाळीच्या सणानिमित्त शहरात राहणारी नातवंडे गावाकडे आल्यानंतर आजी-आजोबांच्या आनंदाला पारावार उरत नाही. नातवंडांचे बोबडे बोल, त्यांच्यासोबत खेळणे, गप्पा मारणे, लाड करणे आणि त्यांना आपल्या जुन्या आठवणी सांगणे, या क्षणांत आजी-आजोबांचे दिवस आनंदात जातात. वर्षभर नातवंडांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आजी-आजोबांसाठी दिवाळी म्हणजे जणू आनंदाची पर्वणीच असते. आता दिवाळी संपल्यानंतर नातवंडे पुन्हा शहराकडे रवाना झाली असली, तरी त्यांच्या सहवासातील गोड आठवणी मात्र आजी-आजोबांच्या मनात कायम राहणार आहेत.

कारण माणूस रोजगारासाठी शहरात जातो; पण मनाने तो कायम आपल्या गावातच जगत असतो!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!