ब्रेकिंग

बिरसा मुंडा यांचा जल, जंगल, जमिनीच्या हक्कांसाठीचा लढा सदैव प्रेरणादायी!

बिरसा मुंडा यांचा जल, जंगल, जमिनीच्या हक्कांसाठीचा लढा सदैव प्रेरणादायी!
आदिवासी समाजाचे योगदान भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत मोलाचे – प्रा. बाबा खरात
संगमनेर । प्रतिनिधी । आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आणि ब्रिटिशांविरोधात केलेले बंड इतिहासात अजरामर आहे. शेतसारा माफ करण्यासह आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले.

यशोधन कार्यालयाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण देशात हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. खरात बोलत होते. यावेळी भास्करराव खेमनर, विजय हिंगे, तुषार गवांदे, प्रशांत गडाख, मोहन दिघे, डॉ. विजय पवार, सुनील गुंजाळ, शंकर गवारी, विठ्ठल मेंगाळ, दिलीप कांबळे, विठ्ठल जाधव, बाळकृष्ण गांडाळ, संगीता मोरे, लक्ष्मण गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. बाबा खरात पुढे म्हणाले की, जगातील इतर संस्कृतींच्या उदयापूर्वीपासून माणसाला माणूसपणाची जाणीव करून देणारी आणि निसर्गाचे श्रेष्ठत्व जपणारी संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती होय. आदिवासी संस्कृती ही जगाच्या उत्थानाची गंगोत्री मानली जाते. भारतीय संस्कृतीची खरी ओळख जगाला करून देण्यात आदिवासी संस्कृतीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजवाद, स्त्री-पुरुष समानता आणि परस्पर सन्मान या मूल्यांच्या जपणुकीत आदिवासी समाजाचा मोलाचा वाटा आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा मूळ स्रोतही आदिवासी संस्कृतीत आढळतो. गुलामगिरी आणि अन्यायाविरोधात आदिवासी समाजाने सातत्याने संघर्ष केला आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारा समाज म्हणून आदिवासी समाजाची ओळख आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तनासाठी केलेल्या आदिवासींच्या उठावाला ‘उलगुलान’ असे म्हटले जाते. भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आणि संदेश आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊया, असे आवाहनही प्रा. खरात यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण गांडाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिलीप बांबळे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!