संगमनेरच्या सहकाराची ताकद जिल्ह्याने पुन्हा अनुभवली! – रणजितसिंह देशमुख

संगमनेरच्या सहकाराची ताकद जिल्ह्याने पुन्हा अनुभवली! – रणजितसिंह देशमुख

सत्तेची ताकद नसतानाही जिल्ह्यातील नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वासाठी एकवटले
तालुक्यातील सहकारी संस्था आणि बाळासाहेब थोरात यांचा प्रतिनिधी म्हणून मला जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे. स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेत ज्या पदांवर काम केले, त्याच पदावर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आपण आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासाला आम्ही पूर्णपणे पात्र ठरू. संगमनेरच्या सहकाराच्या परंपरेला आणि लौकिकाला साजेसे काम जिल्हा बँकेत करून दाखवू.— रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष, जिल्हा बँक
ही ताकद केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतूनही ती स्पष्ट झाली आहे. आपल्या पॅनलला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. संगमनेर तालुक्यातील सुमारे ८८ टक्के मतदान आपल्या बाजूने झाले, तर केवळ १० ते १२ टक्के मतदान विरोधात गेले. या मतदानातून सहकार क्षेत्रातील एकजूट आणि नेतृत्वावरील विश्वास दिसून आला. या निवडणुकीच्या माध्यमातून संगमनेरच्या सहकाराची ताकद संपूर्ण जिल्ह्याच्या लक्षात आली आहे.स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी संगमनेरमध्ये खऱ्या अर्थाने सहकाराची भक्कम उभारणी केली. केवळ सहकारी संस्था स्थापन केल्या नाहीत, तर त्या कशा पद्धतीने चालवाव्यात, याची शिस्तही त्यांनी घालून दिली. संस्थांचे कामकाज कसे असावे, नियोजन कसे करावे, पारदर्शकता कशी राखावी, याबाबत त्यांनी आदर्श नियमावली तयार केली. आजही याच शिस्तीने आणि पारदर्शकतेने तालुक्यातील सहकारी संस्था काम करीत आहेत.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या सहकारी संस्थांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेला सहकाराचा आदर्श आणि शिस्त पुढे नेण्याचे काम बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यांचे सहकारी संस्थांच्या कामकाजाकडे नेहमीच बारकाईने लक्ष असते. सहकार हीच संगमनेरची खरी ताकद असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ताकदीचा अनुभव संपूर्ण जिल्ह्याला आला आहे.



