ब्रेकिंग
चिमुकल्या वेदच्या सुरेल भजनाने नामकरण सोहळ्यात जिंकली उपस्थितांची मने !

चिमुकल्या वेदच्या सुरेल भजनाने नामकरण सोहळ्यात जिंकली उपस्थितांची मने !

हार्मोनियमची साथ देत विठ्ठलनामाचा गजर; वारकरी परंपरेचे बालवयातच संस्कार
संगमनेर । प्रतिनिधी । घुलेवाडी येथील राऊत – पवार कुटुंबीयांच्या नामकरण सोहळ्यात चिमुकल्या वेद राजेंद्र मुरादे याने आपल्या सुरेल आवाजात भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अत्यंत कमी वयात हार्मोनियमची साथ देत विठ्ठलनामाचा गजर करणाऱ्या वेदच्या सादरीकरणाने सोहळ्यातील वातावरण भक्तिमय झाले.नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात वेदने आपल्या गोड आवाजात भजनाला सुरुवात केली. त्याच्या निरागस आणि सुरेल स्वरांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, केवळ भजन गायनच नव्हे, तर स्वतः हार्मोनियम वाजवत त्याने आत्मविश्वासाने भजन सादर केले. त्याच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
नारायणगाव येथे वास्तव्यास असलेले श्री.राजेंद्र मुरादे यांच्या कुटुंबातील वेद याला लहान वयातच भजन, कीर्तन आणि वारकरी संप्रदायाची आवड निर्माण झाली आहे. संतांचे अभंग, विठ्ठलनाम आणि अध्यात्मिक परंपरेची त्याने जोपासलेली गोडी विशेष कौतुकास्पद ठरत आहे.महाराष्ट्राला संतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून, अभंग, कीर्तन आणि हरिनामाच्या माध्यमातून हा वारसा पिढ्यान्पिढ्या जपला जात आहे. वेदसारखी बालके लहान वयातच या परंपरेशी जोडली जात असल्याने वारकरी संप्रदायाचे संस्कार नव्या पिढीत रुजत असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे. वेदच्या या कलागुणांचे उपस्थितांनी कौतुक केले. त्याच्या पुढील कलाप्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या. चिमुकल्या वयातच संगीत आणि भक्तीची सांगड घालणाऱ्या वेदच्या सादरीकरणाने नामकरण सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.



