ब्रेकिंग

मातीत राबणाऱ्या आई-वडिलांना लेकाची आकाशभरारीची भेट; शुभमच्या प्रेमाची गावात चर्चा!

मातीत राबणाऱ्या आई-वडिलांना लेकाची आकाशभरारीची भेट; शुभमच्या प्रेमाची गावात चर्चा!
मातीत राबणाऱ्या आई-वडिलांना लेकाची आकाशभरारीची भेट; शुभमच्या प्रेमाची गावात चर्चा!
कोपरगाव । प्रतिनिधी । आयुष्यभर मातीत राबायचे, उन्हातान्हात कष्ट करायचे, कधी स्वतःच्या शेतात तर कधी दुसऱ्याच्या शेतावर जाऊन बैलांच्या साह्याने पेरणी करायची… मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढायचा आणि त्यातून आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू द्यायची नाही, हा एकच ध्यास मनाशी बाळगून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांना आता त्यांच्याच मुलाकडून चक्क विमानप्रवासाची अनोखी भेट मिळणार आहे. ही गोष्ट आहे कोपरगाव तालुक्यातील जवळके गावचे शेतकरी वसंत कारभारी थोरात यांची आणि त्यांच्या कष्टाचे चीज करणाऱ्या मुलगा शुभम थोरात याची!
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंब म्हटले की शेती, जनावरे, पेरणी, मशागत आणि रोजच्या कष्टांचे चक्र कधीच संपत नाही. वसंत कारभारी थोरात यांनीही संपूर्ण आयुष्य याच कष्टात घालवले. स्वतःची शेती सांभाळतानाच दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन बैलांच्या साह्याने पेरणी करण्याचे काम त्यांनी केले. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आर्थिक परिस्थिती फारशी अनुकूल नसतानाही मुलांच्या शिक्षणासाठी मात्र त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी आयुष्यात मोठे व्हावे, यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली.वडिलांच्या घामाचे मोल आणि आई-वडिलांनी सोसलेल्या कष्टांची जाणीव मुलगा शुभम थोरात याने ठेवली. शिक्षणाच्या जोरावर त्याने स्वतःचे करिअर घडवले असून, सध्या तो बेंगलोर येथे नोकरी करत आहे. मात्र, शहरात नोकरी मिळाल्यानंतरही त्याने आपल्या गावातील मातीचा आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा विसर पडू दिला नाही.
आई-वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, आपल्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्याला प्राधान्य दिले. परिस्थितीमुळे त्यांना अनेक सुखांचा त्याग करावा लागला. ही जाणीव शुभमच्या मनात कायम आहे. म्हणूनच त्याने आपल्या आई-वडिलांना विमानप्रवास घडविण्याचे ठरवले आहे. एवढेच नव्हे, तर तिरुपती बालाजीसह विविध देवस्थानांचे दर्शन घडवून त्यांना आनंदाचे अविस्मरणीय क्षण देण्याचा त्याचा मानस आहे.विशेष म्हणजे, ज्या वडिलांनी आयुष्यभर बैलांच्या साह्याने शेतीची पेरणी केली, त्याच वडिलांना आता मुलगा विमानप्रवासाचा आनंद देणार आहे. ज्या हातांनी आयुष्यभर नांगराचा फाळ धरला, त्या हातांना मुलगा आकाशातील सफरीचा आनंद देणार आहे. हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून, तो वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांना मुलाकडून मिळणारी प्रेमाची अनोखी परतफेड ठरणार आहे.
आज अनेकजण मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचा विसर पडताना दिसतात. मात्र, शुभम थोरात याने आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवली आहे. मुलगा किती मोठ्या पदावर पोहोचला, किती पैसा कमावला, यापेक्षा त्याने आपल्या आई-वडिलांना किती आनंद दिला, हेच खरे यश असल्याचे या कृतीतून दिसून येते.वसंत कारभारी थोरात यांनी कधीकाळी दुसऱ्याच्या शेतात बैलांच्या साह्याने पेरणी करून मुलांच्या शिक्षणाची स्वप्ने पाहिली. त्या स्वप्नांना मुलगा शुभमने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने आकार दिला. आता त्याच वडिलांना विमानप्रवास घडवून आणि विविध देवस्थानांचे दर्शन घडवून त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर आठवण निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
खरंच, आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवणारा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी धडपडणारा मुलगा हेच आई-वडिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठे समाधान असते. कारण मुलाच्या यशापेक्षाही त्याने दिलेला हा प्रेमाचा सन्मान अधिक मोलाचा असतो!
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!