ब्रेकिंग

संगमनेरच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे अ‍ॅक्शन मोडमध्ये!

पोलिसांच्या मदतीला नगरपालिकेचे रक्षक दल; प्रश्न न सुटल्यास कारवाईचा इशारा

संगमनेरच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे अ‍ॅक्शन मोडमध्ये!

पोलिसांच्या मदतीला नगरपालिकेचे रक्षक दल; प्रश्न न सुटल्यास कारवाईचा इशारा

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर शहरात अलीकडच्या काळात घरफोड्यांसह विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आज संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये विशेष बैठक घेतली. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक बारवकर यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नगरपालिका यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आमदार तांबे यांनी व्यक्त केली.संगमनेर शहराच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे. शहरात १५० हून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यांचे नियंत्रण आणि रेकॉर्डिंग थेट पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षकांच्या केबिनमधूनही या कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे या यंत्रणेचा अपेक्षित वापर होत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित अडचणी दूर करून सर्व कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले.

सीसीटीव्ही यंत्रणेसाठी स्ट्रीटलाईटवरून वीजजोडणी घेण्यात आली होती. मात्र, महावितरणकडून स्ट्रीटलाईटचे नियंत्रण थेट मुंबईतून होत असल्याने त्याचा परिणाम सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणेवर होत होता. यासंदर्भात महावितरणशी चर्चा करून स्ट्रीटलाईट आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण स्थानिक पातळीवर आणण्यात आले आहे.संगमनेर नगरपरिषदेने शहराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र ‘रक्षक दल’ उभारले आहे. या दलाच्या माध्यमातून सुमारे १२ जवान, दोन गाड्या आणि दोन बुलेटच्या साहाय्याने शहरात नियमित गस्त घातली जाते. पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता असताना नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांचा पोलिसांनी प्रभावी वापर करावा. शहरातील संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढविण्यासाठी रक्षक दलाची मदत घ्यावी, अशा सूचना आमदार तांबे यांनी दिल्या.

विनानंबर प्लेट वाहनांवर कठोर कारवाईचे निर्देश

अलीकडील घरफोड्यांच्या घटनांमध्ये विनानंबर प्लेट वाहनांचा वापर होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून निदर्शनास येत आहे. नंबर प्लेट नसल्यामुळे अशा वाहनांची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात विनानंबर प्लेट वाहने आढळल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार तांबे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. तसेच, शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, सिग्नल व्यवस्था आणि नवीन नगर रोड परिसरातील वाहतुकीचा प्रश्न यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले. याच अनुषंगाने पुढील आठवड्यात शहरातील सर्व बँका, मोठे दुकानदार, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि पार्किंगची आवश्यकता असलेल्या प्रमुख आस्थापनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.बांधकाम परवानगी घेताना पार्किंगसाठी जागा दाखवून प्रत्यक्षात त्या जागेचा पार्किंगसाठी वापर न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. डॉक्टर, हॉस्पिटल्स, मॉल्स, बँका आणि मोठ्या दुकानदारांनी आपल्या आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था करावी. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचीही आवश्यकता आहे. ग्राहकांनी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावल्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची जबाबदारी संबंधित आस्थापनांनीही स्वीकारली पाहिजे, असे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!