ब्रेकिंग

मी_पंडितजींना_पाहिले_होते… बाळासाहेब थोरात, मा. महसूल मंत्री

मी_पंडितजींना_पाहिले_होते…
बाळासाहेब थोरात, मा. महसूल मंत्री
जाहिरात मो-7756045359
मी_पंडितजींना_पाहिले_होते… बाळासाहेब थोरात, मा. महसूल मंत्री
संगमनेर । प्रतिनिधी । मी जोर्वे येथे जिल्हापरिषदेच्या शाळेत होतो. सहावीची वार्षिक परीक्षा संपली होती. आमचे चुलते पंडिततात्या यांची आर्मीत नियुक्ती झाली होती, त्या कामासंदर्भात त्यांना दिल्लीला जायचे होते. डॉ. अण्णासाहेब शिंदे म्हणजे आमचे अण्णामामा पंडितजींच्या मंत्रिमंडळात कृषी खात्याची जबाबदारी सांभाळत होते.

डॉ. अण्णासाहेब आणि हिराआत्या कुटुंबासह दिल्लीत वास्तव्यास होते. चुलते पंडितराव तात्या दिल्लीला जाणार म्हणून हिरा आत्याने मलाही सोबत घेऊन येण्याबद्दल निरोप पाठवला. दिल्लीला जायला मिळणार म्हणून मला आनंद झाला. पंडित तात्यांबरोबर मीही रेल्वेने दिल्लीला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा मी इतका मोठा प्रवास केला. अण्णासाहेबांची मुले अशोक, अनिल, दिलीप आणि विजया आमच्यात पहिल्यापासून चांगली गट्टी होती. दिल्लीतली ती सुट्टी माझ्यासाठी अविस्मरणीय होती. दिल्लीतली वेगवेगळी प्रेक्षणीय ठिकाणे बघण्यात आमचा वेळ कसा जायचा हे कळतही नसायचं. अण्णासाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीत असताना रोज संध्याकाळी ते कुटुंबासोबत एकत्र भोजन करायचे. ही संध्याकाळच्या जेवणाची वेळ माझ्यासाठी कुतूहलाचा विषय होता. जेवताना अगदी अण्णासाहेबांपासून ते मुलांपर्यंत सर्वजण दिवसभर काय काय केले ते एकमेकांना सांगत असायचे. मलाही मी दिवसभर काय केले हे सांगावे लागायचे. आम्ही कुठे फिरायला गेलो, कोणता सिनेमा बघितला वगैरे गोष्टी सांगायचो. या दिल्लीभेटीत माझ्या आयुष्यात कायमची कोरली गेलेली एक गोष्ट घडली. त्यावेळी लहान मुलांना संसदेत जाऊन तिथले कामकाज बघायला परवानगी नसायची, मात्र अण्णासाहेबांनी खास परवानगी काढून मला संसदेचे कामकाज बघण्याची व्यवस्था करून दिली. माझ्या आठवणीनुसार तो १६ मे १९६४चा दिवस होता. त्या दिवशी पंतप्रधान पंडित नेहरू संसदेत आले. वयपरत्वे काहीसे थकलेले नेहरू एका मदतनीसाचा आधार घेऊन संसदेत आले, मी जेमतेम अकरा वर्षांचा होतो. नेहरूंचे व्यक्तिमत्व थोरा मोठ्यांना माहीत होते. त्यांच्याबद्दल कमालीचा आदर समग्र देशात होता. त्यामुळे अगदी भारावल्यासारखा डोळेभरून मी त्यांच्याकडे बघत होतो. त्यादिवशी इतर काय काय बघितले, ऐकले ते काहीच आठवत नाही. डोळ्यासमोर दिसते ती केवळ पंडितजींची थकलेली परंतु तरीही प्रसन्न दिसणारी मूर्ती. दिल्लीची सुट्टी संपवून मी दिल्लीतल्या भावंडांसह जोर्वेला गावी आलो आणि उर्वरित सुट्टीचा आनंद घेणे सुरु झाले. २७ मे ची दुपार होती. चारच्या दरम्यान गावाशेजारून वाहणाऱ्या प्रवरेच्या पात्रात आम्ही मुले पोहत होतो. तितक्यात गावातला एकजण पळत पळत आला आणि पंडितजी गेले अशी बातमी सांगितली. त्यावेळी ग्रामीण भागात माहिती मिळवण्याचे रेडीओ हेच एकमेव साधन असायचे. आकाशवाणीच्या दुपारच्या बातमीपत्रात ही बातमी ऐकून त्या व्यक्तीने आम्हाला ही गोष्ट सांगितली. दिल्लीहून आल्यावर मोठ्या कौतुक मिश्रित अभिमानाने माझ्या मित्रमंडळींना मी साक्षात नेहरूंना बघून आल्याचे सांगितले होते. क्षणार्धात नदीतून बाहेर आलो आणि कुणाशी काहीही न बोलता मूकपणे आम्ही सर्वजण घरी आलो. आमच्या घरीही नेहरू गेल्याने वातावरण गंभीर झाले होते. मला तर जणू काही माझ्या जवळचचे कुणी गेले आहे अशी भावना झाली होती. अण्णासाहेबांमुळे मला पंडितजी डोळ्यात आणि मनात साठवता आले होते या गोष्टीचे त्या अजाणत्या वयातही अप्रूप होते. पंडितजींच्या पुण्यतिथी निमित्ताने हा सगळा पट पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला.
—
आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरूजी यांना विनम्र अभिवादन.
—
बाळासाहेब थोरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!