‘गतीमान नागरी सेवा पुरस्कार’ प्रत्येक विभागाला मिळाला पाहिजे – आ.आशुतोषकाळे

‘गतीमान नागरी सेवा पुरस्कार’ प्रत्येक विभागाला मिळाला पाहिजे – आ.आशुतोषकाळे


कोपरगावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
कोपरगाव । प्रतिनिधी । सर्वाभिमुख नेतृत्व असलेले अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करतांना त्यांची नेहमी अपेक्षा होती की, नागरिकांच्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजे आणि त्यासाठी आपले प्रशासन गतिमान असले पाहिजे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ महायुती शासनाने त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्याचे जाहीर केले आहे. हा पुरस्कार प्रशासनातील प्रत्येक विभागाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने काम करा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त शुक्रवार (दि.३१) रोजी कोपरगावात महात्मा गांधी प्रदर्शन चॅरीटेबल ट्रस्ट हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, शासनाकडून नागरिकांना लाभाचे वितरण वेळेत झाले पाहिजे किंवा शासनाच्या माध्यमातून नागरीकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजे अशी अपेक्षा नेहमी स्व. अजितदादांची होती आणि हीच अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांची पण आहे.स्व. अजितदादा हे हाडाचे शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व होते. शेती, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, भाजीपाला, साखर कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था, दूध संस्था आणि मार्केट कमिट्यांपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्याचबरोबर नगर विकास, ग्रामविकास, सहकार यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवरील त्यांचे प्रभुत्व आणि शहरी विकासाविषयीची त्यांची दूरदृष्टी उल्लेखनीय होती. कामाच्या बाबतीत स्वत:शिस्तप्रिय असल्यामुळे प्रशासनेही शिस्त पाळून नागरीकांचे प्रश्न वेळेत सोडविले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या गतिमान नागरी सेवा पुरस्काराचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्देश लक्षात घेवून नागरीकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे अतिशय उत्कृष्ठ पणे काम सुरु आहे. राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियान मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना. राधाकृष्णजी विखे पा.यांच्या संकल्पनेतून अतिशय यशस्वीपणे राबवीले जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या जास्तीत जास्त अडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. प्रशासनाकडून जास्तीत जास्त काम मार्गी लावून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.त्यामुळे नागरीकांना केवळ शिबिराच्या दिवशीच गतिमान सेवा न देता वर्षभर प्रशासनाचे काम गतिमान कसे राहील यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामुहिक प्रयत्न करावे. आणि शासनाच्या सर्व लाभाच्या योजनांचा सगळ्यात जास्त लाभ कोपरगाव मतदार संघातील पात्र आणि गरजू नागरीकांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.यावेळी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, गटविकास अधिकारी स्वप्निल वाळुंज, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी, नगरपरिषद मुख्याधिकारी अजित निकत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेबूब शेख, नायब तहसीलदार सौ.प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र खरोटे, बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ आदींसह सर्व विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीणजी शिंदे, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.



