पालखेड डाव्या कालव्यातून पूर्व भागातील पाझर तलाव, बंधारे भरून द्या

पालखेड डाव्या कालव्यातून पूर्व भागातील पाझर तलाव, बंधारे भरून द्या


आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना
कोपरगांव । प्रतिनिधी । पालखेड डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले असून या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या सर्व गावातील बंधारे आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. चालू वर्षी हवामान खात्याने कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्यानुसार जून महिन्यात पाऊस पडलाच नाही मात्र जुलै महिन्यात जून महिन्याची काही प्रमाणात कसर भरून निघाली असून वरच्या भागातील सर्वच धरणे जवळपास भरली आहे. मात्र अजूनही काही भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावलेली आहे. सध्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरु झाल्यामुळे पालखेड डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यातून उक्कडगाव, तिळवणी, दहेगाव बोलका, कासली, पढेगाव, ओगदी-अंचलगाव, सावळगाव, नाटेगाव आणि कोळ नदीवरील गोधेगाव बंधारे आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या.सध्या जरी पाऊस सुरु असला तरी या गावातील बंधाऱ्यांमध्ये पाणी शिल्लक नाही. हवामान खात्याकडून पुन्हा काहीसा चिंताजनक वर्तविण्यात आला आहे. या भागातील काही गावांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात पूर्व भागात पाण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सुरु असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून लाभ क्षेत्रातील बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमानेते भरून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर पेरण्या आणि खरीपाची पिके केलेली आहे. जर आगामी काळात खरीप पिकांसाठी आवश्यक पाऊस पडला नाही तर खरीप हंगामातील संपूर्ण पिके धोक्यात येवून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे गाव बंधारे व पाझर तलाव पूर्णक्षमतेने भरलेले असतील तर त्या पाण्यातून भूजलपातळी वाढू शकते व खालावलेली भूजलपातळी भरून निघण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याला सुरु असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व बंधारे अन पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या आणि सर्व बंधारे अन पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय कालव्याचे पाणी बंद करू नका अशा सक्त सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहे.



