कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
कुकडी-सिना कालव्यांना मिळणार नवसंजीवनी

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील


कुकडी-सिना कालव्यांना मिळणार नवसंजीवनी
अहिल्यानगर । प्रतिनिधी । कुकडी प्रकल्प हा अनेक गावांसाठी जीवनदायी ठरणारा महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत कुकडी व सिना प्रकल्पाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत कुकडी व सिना प्रकल्प लाभक्षेत्रातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.बैठकीदरम्यान उपस्थित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी कालव्यांच्या दुरुस्ती, मोजणी, भूसंपादन मोबदला, कमांड एरियातील शेतीला पाणी उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ घडविण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पाची पाणी वहन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.कालव्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पाची भविष्यातील गरज लक्षात घेऊन कालव्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागाने तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करावा. त्यानंतर दुरुस्ती व क्षमतावाढीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भूसंपादन मोबदल्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
कुकडी प्रकल्पातील भूसंपादन व मोबदल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल. शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात विशेष बैठक
कुकडी व सिना प्रकल्पाशी संबंधित सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात कर्जत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सत्वन, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



