ब्रेकिंग
कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
डंपरसह २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकास ताब्यात

कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


डंपरसह २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकास ताब्यात
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत डंपरसह एकूण २५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रज्वल शरद भालेराव (वय २२, रा. खडकी, ता. कोपरगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीश भवर व प्रकाश मांडगे यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले होते.दि. ९ ऑगस्ट रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत प्रज्वल भालेराव हा सांगवी रोडकडून टाकळी फाटा, कोपरगावच्या दिशेने विनापरवाना डंपरमधून वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पथकाने टाकळी फाटा येथे सापळा रचून डंपर अडविला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.या कारवाईत २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विना क्रमांकाचा डंपर आणि ६० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रज्वल भालेराव याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.



